सावंतवाडी दिवा पॅसेंजरमध्ये प्रवासी महिलेचा संशयास्पद मृत्यू

लांजा:– कोकण रेल्वेमार्गावरील सावंतवाडी दिवा पॅसेंजरमध्ये लांजातील एका प्रवासी महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (२३ मार्च) दुपारी येथे घडली. या घटनेचा रेल्वे पोलिसांनी पंचनामा केला असून, तिच्या मृत्यूचे कारण अद्याप उघड झालेले नाही.

सावंतवाडी दिवा पॅसेंजर रेल्वेगाडीने मुंबईकडे ही महिला जात होती. प्रवासात संगमेश्वरदरम्यान अचानक तिच्या छातीत दुखू लागले. त्यानंतर चिपळूणजवळ येताच अतिवेदना होऊ लागल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर रेल्वेच्या आरोग्य यंत्रणेला सांगण्यात आले. चिपळूण रेल्वेस्थानकात गाडी पोहोचताच आरोग्य यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांनी प्राथमिक तपासणी केली. मात्र, त्या महिलेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यावरून काही रेल्वे प्रवाशांनी गोंधळ घालत रेल्वेच्या आरोग्य यंत्रणेवर आक्षेप घेतला.

याचवेळी तेथे रेल्वेचे डॉ. शिरीष मदार पोहाेचले. त्यांनी तिची तपासणी करून तिला मृत घोषित केले. यावेळी रेल्वे प्रशासनाच्या दिरंगाईमुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप काही प्रवाशांनी केला. या घटनेचा रेल्वे पोलिसांनी पंचनामा केला आहे. मात्र, महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

संबंधित महिलेचा आधीच मृत्यू झाला होता. परंतु, मृत्यू कशामुळे झाला हे शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होईल. या घटनेवेळी प्रवाशांनी आरोग्य यंत्रणेला सहकार्य न करता विनाकारण गोंधळ घातला. एवढेच नव्हे, तर रेल्वे पोलिसांनी बोलावलेली रुग्णवाहिका एका प्रवाशाने फोन लावून रद्द केली. –डाॅ. शिरीष मदार