पाडव्याच्या मुहूर्तावर 60 हजार पेटी वाशीत

आवक वाढली; डझनाला हापूस 400 ते 1200 रुपये

रत्नागिरी:- गुडीपाढव्याच्या मुहूर्तावर वाशी येथील बाजार समितीमध्ये विविध प्रकारच्या आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दरवर्षी पेक्षा यंदा गुडीपाढव्याला अधिक पेट्या दाखल झाल्या आहेत. बुधवारी (ता. 22) सुमारे 60 हजार आंब्याच्या पेट्या मार्केटमध्ये आल्या. यामध्ये कोकणातून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गतील 48 हजार पेट्यांचा समावेश आहे. त्यात देवगडीमधील सर्वाधिक 60 टक्के, रत्नागिरीतील वीस टक्के आणि रायगड, वेंगुर्ला व बाणकोटमधून उर्वरित वीस टक्के आंबा जातो. कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेशमधून वाशीत सुमारे 12 हजार पेट्या आल्या आहेत.

साडेतिन मुहूर्तापैकी एक म्हणून गुढीपाडवा सण ओळखला जातो. गेल्या काही वर्षात कोकणातील बागायतदार व्यावसायीक दृष्टीकोन पाहून आंबा लवकरात लवकर बाजारात आणण्याचे नियोजन करतो. त्यामुळे फेब्रुवारीच्या अखेरीस आणि मार्च महिन्यात बर्‍यापैकी पेट्या कोकणातून जातात. यंदा वातावरणातील बदलांमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदारांना पहिल्या टप्प्यातील उत्पादन अपेक्षित नसल्याचे सांगण्यात आले. मार्चच्या पहिल्या आठवड्यांन राजापूरसह रत्नागिरी तालुक्यातील काही भागातून आंबा वाशीकडे पाठविण्यास सुरवात झाली; परंतु सिंधुदुर्गमधून चांगल्या प्रमाणात आंबा बाजारात गेल्याचे वाशीतील व्यावसायीकांकडून सांगण्यात येत आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये वाशीमध्ये 40 ते 60 हजारच्या दरम्यान आंबा पेटीची आवक होत आहे. गुढीपाडव्याला मोठी वाढ झाली असून दरही दिड हजार ते 4 हजार रुपये पाच डझनच्या पेटीवर आकारला जात आहे. गतवर्षीच्या तुलनेत आंबा अधिक असला तरीही दर दोन हजार रुपयांनी कमी आहेत.

एप्रिलमधील आवक घटणार

गेले तीन ते चार दिवस राज्यात अवकाळी पाऊस पडत आहे. कोकणातील काही भागातही हलका पाऊस झाला. त्याचा मोठा परिणाम आंब्यावर झाला नसला तरीही काही ठिकाणी शेवटच्या टप्प्यातील पिकाला धक्का बसला आहे. विशेषतः रत्नागिरी तालुक्यातील पावस, जयगड परिसरातील बागायतदारांकडून अवकाळीचा परिणाम झाल्याचे सांगण्यात आले. मार्च महिन्यात आवक बर्‍यापैकी असली तरी एप्रिल महिन्यात आवक कमी राहिल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.