रत्नागिरीत मागील दहा दिवस तापमानाचा पारा ३५ अंशांवर

रत्नागिरी:- उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असुन त्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. उष्माघाताची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य विभागाने सतर्कतेच्या सुचना दिल्या आहेत. गेल्या दहा दिवसांमध्ये पारा ३५ ते ३६ अंश सेल्सिअस दरम्यान राहिला. गतवर्षी मार्च महिन्यात सुरवातीला अशीच स्थिती होती. उन्हामुळे पहिल्या टप्प्यातील हापूस आंब्याची काढणी वेगाने सुरु आहे. गतवर्षीच्या तुलनेत तिप्पट पेटी मार्केटमध्ये दाखल झाली आहे. त्यामध्ये सिंधुदुर्गच्या तुलनेत रत्नागिरी जिल्ह्यातून कमी पेट्या जात आहेत.

ग्लोबल वॉर्मिंगमुळे यंदा उष्णतेचा प्रभाव लवकर जाणवू लागला. फेब्रुवारी महिना सर्वाधिक उष्ण राहील्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. कोकणातील महाबळेश्‍वर म्हणून ओळखल्या जाणार्‍या दापोलीमध्ये मार्चच्या पहिल्या आठवड्यात पारा ३६ अंश सेल्सिअस पार करुन पुढे गेला आहे. महाशिवरात्रीला म्हणजेच १७ ते १९ फेब्रुवारीला पारा रत्नागिरी तालुक्यात ३७ अंशावर गेले होते. उन्हाच्या झळांनी कोकणवासीय चांगलेच त्रस्त झाले आहेत. आरोग्य विभागाकडूनही वाढत्या तापमानाला सामोरे जाण्यासाठी सुचना दिल्या आहेत. नियमित तापमानापेक्षा तिन अंश सेल्सिअसने पारा वर सरकरण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. मार्चच्या पहिल्या दहा दिवसात सलग काही दिवस ३५ ते २६ अंश सेल्सिअसपर्यंत पारा स्थिर राहीला आहे. मागील दहा वर्षात असे चित्र पहायला मिळालेले नाही. दुपारच्या सुमारास उन्हाच्या झळा सर्वाधिक जाणवतात. कातळावर त्याची तिव्रता अधिक असते. मार्च, एप्रिल व मे या तिन्ही महिन्यात उष्म्याचे प्रमाण वाढत राहिल असा अंदाज असल्यामुळे कोकणवासीयांना त्यादृष्टीने सज्ज रहावे लागणार आहे. गेल्या काही दिवसात वाढलेल्या उन्हामुळे पहिल्या टप्प्यातील आंबा वेगाने तयार होऊ लागला आहे. सुर्याच्या प्रखरतेमुळे फळ पिवळे पडून ते खराब होण्याचे प्रकारही वाढलेले आहेत.