संकष्टीला गणपतीपुळ्यात 20 हजाराहून अधिक भक्त

जोडून सुट्ट्या पथ्थ्यावर ; पश्‍चिम महाराष्ट्रासह मुंबई, पुण्यातील पर्यटक

रत्नागिरी:- जोडून आलेल्या शासकीय सुट्ट्या, शिमगोत्सव यामुळे शनिवारी (ता. 11) संकष्टी चतुर्थीला पर्यटकांसह भक्तगण दर्शनासाठी गणपतीपुळेमध्ये दाखल झाले. दिवसभरात 20 हजाराहून अधिक भक्तांनी हजेरी लावली. कडाक्याच्या उन्हातही पश्‍चिम महाराष्ट्रासह मुंबई, पुण्यातील पर्यटकांची उपस्थित लक्षणीय होती. मार्च महिना दरवर्षी पर्यटनस्थळावरील व्यावसायिकांसाठी यथातथाच जातो; मात्र आजची संकष्टी या व्यावसायिकांच्या पथ्थ्यावर पडली आहे.

शनिवारी पहाटेला आरती झाल्यानंतर गणपतीपुळेतील श्रींचे मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. संकष्टी चतुर्थीसाठी आज श्रीं च्या भोवती सजावट केली होती. सायंकाळी 4 वाजता पालखी बाहेर पडली. यावेळी देवस्थानचे पुजारी सोबत होते. श्रींच्या दर्शनासाठी आज सकाळपासूनच गणपतीपुळेमध्ये गर्दी होती. उष्णतेच्या लाटेमुळे जिल्ह्यात पारा 36 अंशापर्यंत पोचला होता. या परिस्थितीमध्येही पर्यटक गणपतीपुळेमध्ये दर्शनासाठी शुक्रवारपासूनच येण्यास सुरवात झाली. सर्वाधिक पर्यटक कोल्हापूर, सांगली, सातारा या परिसरातील होते. शिमगोत्सवासाठी कोकणातील गावी आलेल्या मुंबई, पुण्यातील लोकांनीही दर्शनासाठी पुळ्यात हजेरी लावली. दिवसभर दर्शन घेतल्यानंतर किनार्‍यावर पर्यटकांची आपसुकच पावले वळत होती. त्याचा फायदा किनार्‍यावरील फेरीवाल्यांसह छोटी-मोठी हॉटेल, विक्रेते यांना झाला. वीस टक्केहून अधिक पर्यटकांनी उद्या रविवारी असल्यामुळे मुक्काम केला. जोडून शासकीय सुट्ट्या आल्यामुळे गणतपीपुळेत संकष्टीच्या दिवशी वीस हजार पर्यटकांनी मंदिरात हजेरी लावल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
दरम्यान, मार्च महिन्यात दहावी, बारावीच्या परिक्षा असल्यामुळे या कालावधीत गणपतीपुळ्यात पर्यटकांसह भक्तांची तेवढी गर्दी नसते. कोरोनानंतर आणि शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा केल्यानंतर शनिवारी आणि रविवारी पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होऊ लागली. यंदा मार्च महिन्याच्या सुरवातीच्या पहिल्या शनिवारी गणपतीपुळेत तेवढी गर्दी नव्हती. मात्र संकष्टीला दर्शनासाठी आलेल्या भक्तांमुळे गणपतीपुळेत गर्दी होती.