शिमगोत्सवाला भरते! भैरीबुवा आजपासून भक्तांच्या भेटीला

रत्नागिरी:- जिल्ह्यात उभारलेल्या होळ्यांचा मंगळवारी शेवटचा दहावा होम होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 1 हजार 315 सार्वजनिक आणि 2 हजार 854 खासगी होळ्यांचा शेवटचा होम होवून त्या तुटणार आहेत.

तर आजपासून बारा वाड्यांचा राजा श्री देव भैरी बुवाच्या शिमगोत्सवाला आरंभ होणार आहे. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी रात्री १० वा. सहाणेवरून श्रीदेव भैरीला उत्सवाचे निमंत्रण म्हणून गावकरी, मानकरी, ट्रस्टी, गुरव मंडळी व ग्रामस्थ मंडळी पारंपरिक पध्दतीत झाडगांव सहाणेवरुन महालक्ष्मी शेतातून श्रीदेव भैरी मंदिरात रात्री ठिक ११ वाजेपर्यंत जातील. मध्यरात्री १२ वाजता श्रीदेव भैरीची पालखी श्रीदेवी जोगेश्वरी भेटीसाठी, ग्राम प्रदक्षिणा व जोगेश्वरीची होळी उभी करण्यासाठी श्रीदेव भैरी मंदिरा बाहेर पडेल व खालची आळी, बाळोबा सावंत यांच्या आगरातून महालक्ष्मी शेतातून मध्यरात्रीनंतर १.३० वाजेपर्यंत श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरात जाणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात शिमगोत्सव हा मोठा सण म्हणून साजरा केला जातो. परजिल्ह्यातून चाकरमानी या सणासाठी आवर्जून गावाकडे येतात. 24 फेब्रुवारीपासून होळीच्या फाक पंचमीला प्रारंभ झाला. शिमगोत्सवात ग्रामदेवता पालख्यांमधून घरोघरी येत असतात. या देवतांच्या दर्शनासाठी प्रत्येकजण आतुरलेला असतो. जिल्ह्यात 1 हजार 399 सजलेल्या पालख्यांमधून देव दर्शन देतात. रत्नागिरी जिल्ह्यात शिमगोत्सवाचा मोठा जल्लोष असतो. फाक पंचमीला गावागावात होळ्या उभ्या राहिल्यानंतर शिमगोत्सवाला प्रारंभ होतो. अनेक ग्रामदेवतांच्या पालख्या शिमगोत्सवाच्या होळ्या घेण्यासाठी मंदिराबाहेर येतात. ढोल-ताशांच्या गजरात आणि फाकांच्या धामधूमीत पालख्यांचे स्वागत होते.
मंगळवारी शेवटच्या फाक पंचमीनंतर ग्रामदेवतांच्या पालख्या सहाणेवर विराजमान होतात. या ठिकाणी या देवतांचा मान दिला जातो. त्याचबरोबर येथे विविध पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यातील काही ग्रामदेवतांच्या पालख्या रंगपंचमीच्या दिवशी, काही पालख्या गुढीपाडव्यानंतर मंदिरांमध्ये जातात. या संपूर्ण शिमगोत्सवाच्या काळात खेळे, सोंग हा एक आकर्षक कलाप्रकार पहावयास मिळतो.