कोरे मार्गावरील चार एक्स्प्रेस पर्यायी मार्गाने वळवल्या

रत्नागिरी:- सुरतजवळील उधना रेल्वे यार्डात सुरू असलेल्या कामामुळे कोकण रेल्वे मार्गे धावणार्‍या राजधानी तसेच दुरंतो एक्स्प्रेससह लांब पल्ल्याच्या एकूण चार एक्स्प्रेस गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. याचबरोबर उधना ते मंगळूरदरम्यान दि. ५ मार्च रोजीची होळी स्पेशल गाडी उधना जंक्शन ऐवजी त्या आधीच्या वलसाड स्टेशनवरून मंगळूरूसाठी सोडण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वेच्या सुरत स्थानकाजवळील उधना रेल्वे यार्डात रि मॉडेलिंगचे काम चालणार आहे. या कामाचा परिणाम कोकण रेल्वे मार्गे धावणार्‍या काही लांब पल्ल्याच्या गाड्यांवर झाला आहे. या संदर्भात रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दि. ५ मार्च रोजी उधना ते मंगळूरूदरम्यान धावणारी होळी स्पेशल ट्रेन (०९०५७ ) वलसाड स्टेशनवरून कोकण रेल्वे मार्गावर येण्यासाठी निघाली आहे.

याचबरोबर या मार्गावरून कोकण रेल्वेच्या मार्गावर येणार्‍या चार गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. दि. ५ मार्च रोजी सुटणारी हजरत निजामुद्दीन ते तिरुअनंतपुरम (११४३२ ) ही राजधानी एक्स्प्रेस नागदा, भोपाळ जंक्शन, इटारसी, भुसावळ, कल्याण, पनवेलसमार्गे कोकण रेल्वे मार्गावर येणार आहे.
दि. ४ मार्च रोजी प्रवास सुरू झालेली व १२२८४ क्रमांकासह धावणारी निजामुद्दीन – एर्नाकुलम दुरंतो एक्स्प्रेस ही राजधानी एक्स्प्रेस वळवलेल्या मार्गानेच कोकण रेल्वे मार्गावर वळवाव्या लागली आहेत. या शिवाय कोचुवेली – चंदिगड (१२२१७ ) ही दि.४ मार्च रोजी प्रवास सुरू झालेली गाडी पनवेलनंतर कल्याण, भुसावळ , इटारसी भोपाळ मार्गे दिल्लीला जात आहे. दि. ४ मार्च २०२३ रोजी प्रवास सुरू झालेली कोचुवेली ते श्रीगंगानगर एक्स्प्रेस पनवेलनंतर वसई मार्गे न जाता कल्याण खांडवा, इटारसी, भोपाळ जंक्शन, नागदा, रतलाम मार्गे चंदिगडला जात आहे.