जिल्ह्यात महावितरणची २१ कोटी ९० लाखाची थकबाकी

८५ हजार ४४६ ग्राहकांचा समावेश; वसूल करण्याचे मोठे आवाहन

रत्नागिरी:- महावितरण कंपनीची थकबाकी काही कमी होताना दिसेना. जिल्ह्यातील ८५ हजार ४४७ ग्राहकांकडून तब्बल २१ कोटी ९० लाख एवढी थकबाकी आहे. महावितरणच्या एकूण उत्पन्नापैकी ८० टक्के रक्कम ही वीज खरेदीवर खर्च होते. त्यामुळे थकबाकीची वसुली हाच एक उपाय महावितणपुढे आहे. त्यामुळे वीजजोडणी तोडण्याचे कठोर पाऊल महावितरण कंपनीला उचलावे लागत आहे.

जिल्ह्यात महावितरणची थकबाकी अजूनही कोटींच्या घरात आहे. ही थकबाकी वसूल करण्याचे महावितरणसमोर आव्हान आहे. सध्या जिल्ह्यात ८५ हजार ४४७ ग्राहकांकडून २१ कोटी ९० लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये मुख्यत्वे चिपळूण, खेड आणि रत्नागिरी विभागात मिळून घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक अशी मिळून ७२ हजार ३८८ ग्राहकांकडे ७ कोटी ५० लाखांची थकबाकी आहे. त्याचप्रमाणे या तिन्ही विभागात मिळून कृषीची ६ हजार ८५६ ग्राहकांकडे १ कोटी २० लाख, अकृषी व अन्यमध्ये १ हजार ७२२ ग्राहकांकडे ९३ लाख, पथदीपच्या १ हजार ४९८ स्थानिक स्वराज संस्थांकडे ९ कोटी ३४ लाखांची थकबाकी आहे. या शिवाय सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाच्या ९७९ ग्राहकांकडे १ कोटी ८८ लाखांची थकबाकी आहे. अन्य सार्वजनिक सेवांच्या २ हजार ४ ग्राहकांकडे १ कोटी ५ लाखांची थकबाकी आहे. सर्व मिळून जिल्ह्यात महावितरणची २१ कोटी ९० लाखांची थकबाकी आहे. जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकी ही सार्वजनिक पथदिव्यांची आहे. त्यानंतर घरगुती थकबाकी असल्याने वेळीच बिल भरून कारवाई टाळा, असे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे.