कर्मचार्‍यांच्या क्रीडा स्पर्धांवर लाखोंची उधळण मात्र विद्यार्थ्यांच्या स्पर्धांसाठी निधी नाही

जिल्हा परिषद प्रशासनाचा अजब कारभार

रत्नागिरी:- कुठल्याही मोठ्या खेळाडूची कारकीर्द ही शालेय जीवनापासूनच घडत असते. या शालेय जीवनात मुलांच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी स्पर्धांचे आयोजन केले जाते. परंतु, रत्नागिरी जिल्हा परिषदेेने पैसे नसल्याचे कारण देत या वर्षी जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा घेतल्या नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दुसर्‍या बाजूला मात्र कर्मचार्‍यांच्या क्रीडा स्पर्धांवर लाखो रूपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे.

शाळांमधून दर्जेदार क्रीडापटू निर्माण व्हावेत या उद्देशाने दरवर्षी क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. कुठल्याही खेळाडूच्या क्रीडा क्षेत्रातील कारकिर्दीला शालेय जीवनापासूनच सुरूवात होते. सुरूवातीला जिल्हा पातळीवर होणार्‍या या स्पर्धांच्या माध्यमातून राज्य, राष्ट्रीय व इतकेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडापटूंना त्यांच्यातील क्रीडागुण दाखवता येते. अलिकडच्या काळात क्रीडा क्षेत्राला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

कोरोना काळात दोनवर्षे बंद असलेल्या स्पर्धा सुरू होणार की नाहीत या बाबात संदिग्धता होती. मात्र शासनाच्या क्रीडा विभागाने शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीलाच या स्पर्धांना परवानगी दिली होती. क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार्‍या व प्रावीण्य मिळवणार्‍या खेळाडून दहावी बारावी ग्रेडमधून 11वी प्रवेशात 3 टक्के कोटा तर राज्य स्पर्धेपासून पुढे प्राविण्याप्राप्त खेळाडूंना नोकरीत 5 टक्के आरक्षण तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय नोकरीत थेट नियुक्ती मिळते. मात्र मुळात प्राथमिक स्तरावरच्या स्पर्धा न झाल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरवर्षी जिल्हा परिषदेतर्फे डिसेंबर महिन्यात तालुकास्तरावर आणि त्या नंतर जिल्हास्तरावर स्पर्धा होतात. या वर्षी मात्र निधी नसल्याचे कारण देत स्पर्धा झाल्याच नाहीत. जिल्ह्यात फक्त रत्नागिरी व गुहागर तालुक्यात तालुकास्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या आहेत. त्या स्पर्धा शासकीय निधी न वापरता वर्गणी काढून करण्यात आल्याचे समजते. मुळात दरवर्षी जिल्हा परिषद सेसमध्ये क्रीडा स्पर्धेसाठी तरतूद केली जाते. गेली तीन वर्षे स्पर्धा न झाल्यामुळे हा निधी गेला कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दुसर्‍या बाजूला मात्र कर्मचार्‍यांच्या स्पर्धा होत आहेत. नुकतेच जिल्हा परिषदेचे स्नेहसंमेलन पार पडले. यामध्ये शिक्षकांसह सर्वच कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला होता. यावेळी विविध क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या सर्वांवर लाखो रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. ज्यांना खरोखरच खेळाची गरज होती ते उपाशी राहिले आहेत. विशेष म्हणजे याकडे आमदार तसेच मंत्री यांचे लक्ष कसे गेले नाही? ही आश्चर्याची बाब म्हणावी लागेल.