ओमानमध्ये 27 वर्ष अडकलेल्या इक्बाल पावसकर यांना मुस्लीम वेल्फेअर सोसायटीने आणले मायदेशी

रत्नागिरी:- परदेशात नोकरीला घेऊन गेलेल्या व्यक्तीने फसवल्यानंतर तब्बल 27 वर्ष विविध संकटांचा सामना करीत मायदेशी परतण्याची वाट पाहत मृत्यूची प्रतिक्षा करणार्‍या व्यक्तीला लांजाचे कार्याध्यक्ष अकील नाईक व त्यांच्या सहकार्‍यांनी ओमान मधून त्याच्या घरी रत्नागिरीत आणले. एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे वाटणारी ही कथा आहे रत्नागिरी केळ्ये मजगाव येथील इक्बाल पावसकर यांची.

कामानिमित्ताने ओमानला गेलेले इक्बाल नाईक यांना तेथील व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर इक्बाल पावसकर यांची माहिती मिळाली. तेथील सहकार्‍यांच्या मदतीने व मुस्लीम वेल्फेअर कमिटीच्या सदस्यांच्या सहकार्याने इक्बाल पावसकर हे उपचार घेत असलेल्या रुग्णालयात जाऊन त्यांची चौकशी केली. मात्र त्यांच्याकडे ओळखपत्राचा कोणताच पुरावा नव्हता. अगदी पासपोर्ट व व्हिसाही नव्हता. त्यामुळे त्यांची ओळख पटवण्यात प्रचंड मेहनत घ्यावी लागली. इकबाल पावसकर याचे हॉस्पिटलचे जवळपास 4-5 लाखांचे बिल झाले होते. हे बील मुस्लीम वेल्फेअर सोसायटीच्या सदस्यांनी मोफत करुन घेतले. तिथून त्यांची सुटका केल्यानंतर पुढे त्यांना भारतात आणायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला होता. मागील 27 वर्ष मिळेल ते खाऊन स्थानिक पोलिसांच्या भितीने लपूनछपून राहत वास्तव्य केले होते. त्यामुळे त्याठिकाणी तुरुंगात जाण्याची भिती कायम त्यांच्या मनात होती.

मुस्लीम वेल्फेअर सोसायटीचे पदाधिकारी व अकील नाईक यांनी त्यांना विश्वासात घेत ते प्रथम कामाला असलेल्या ठिकाणाची माहिती मिळवली. तेथील लेबर डीपार्टमेंटमध्ये जाऊन एका व्यक्तीने चौकशी केली. तेथील मॅनेजरने पासपोर्ट काढण्यासाठी सहकार्याचा हात दिला.त्यानंतर पावसकर यांचा पासपोर्ट तयार करण्यात आला आणि मुस्लीम वेल्फेअर सोसायटी लांजा यांच्या मदतीने आणि त्यांच्या सर्व सहकार्‍यांच्या मदतीने अखेर इकबाल पावसकर यांचे आपल्या मायदेशी परतण्याचे स्वप्न पूर्ण झाले.

लग्न झाल्यानंतर इक्बाल पावसकर हे 22 व्या दिवशी ओमानला नोकरीसाठी निघून गेले होते. त्यानंतर ते बेपत्ताच होते. घरातील व्यक्तींशीही त्यांचा संपर्क नव्हता. त्यामुळे ते जिवंत आहे की नाही याबाबतही घरच्या लोकांना साशंकता होती. ओमानमध्ये गेली 27 वर्ष विना पासपोर्ट व व्हिसाशिवाय वास्तव्य करणार्‍या इक्बाल पावसकर यांना अकिल नाईक व मुस्लीम वेल्फेअर सोसायटी लांजामुळे पुन्हा कुुटुंबात परतता आले. गेल्या 27 वर्षाचा प्रवास सांगताना इकबाल पावसकर यांचे डोळे पाणावले होते.

भारत देशात आणि परदेशात पसरलेल्या मुस्लीम वेल्फेअर सोसायटीच्या माध्यमातून समाजामध्ये अनेक लोकांना हस्ते परहस्ते मदत केली जात आहे. पण एखादा व्यक्तीला त्यांच्या घरापर्यंत पोहोचवून त्यांच्या हॉस्पिटलचा खर्च व येण्या जाण्याचा खर्च,परत त्या कुटुंबामध्ये त्यांना आधार देण्याची जबाबदारी मुस्लीम वेल्फेअर सोसायटीमाध्यमातून घेण्यात येणार आहे.इक्बाल पावसकर यांना पुन्हा मायदेशी कुटुंबात आणल्याबद्दल मुस्लीम वेल्फेअर सोसायटीचे व अकील नाईक यांचे केळ्ये मजगाव ग्रामस्थांनी आभार मानले.