सार्वजनिक बांधकामच्या निवृत्त कर्मचार्‍यांचे रत्नागिरीत मूक अर्धनग्न आंदोलन

रत्नागिरी:- शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील निवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांनी प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी शुक्रवारी रत्नागिरीत प्रादेशिक परिमंडळासमोर मूक उपोषण केले.सर्व निवृत्त कर्मचारी अर्धनग्न आंदोलनात सहभागी झाले होते.
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांच्या नियुक्तीपासून वेतन निश्चिती करणे, कालबध्द पदोन्नती अंतर्गत वित्त विभागाच्या आदेशानुसार वेतन श्रेणीचा लाभ देणे व आश्वासीत प्रगती योजनेचा लाभ मिळण्यासाठी आंदोलन करण्यात आले.

न्यायालयाच्या निकालाप्रमाणे व राज्यपालांच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाने आदेश देऊनही संबंधित अधिकारी पुर्तता करीत नसल्याने निवÉत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संघटनेने आंदोलन केले. संघटनेच्या कृती समितीचे सचिव शिवाजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर आंदोलन करण्यात आले. कर्मचार्‍यांवरील अन्याय दूर व्हावा यासाठी आणि प्रशासनाच्या चुकीच्या धोरणाच्या निषेधार्थ सर्व वयोवृध्द सेवानिवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कर्मचार्यांनी रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम मंडळ कार्यालय आवारात एक दिवशीय मुक अर्धनग्न आंदोलन केले.
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियमानुसार सर्व १४ संवर्ग कर्मचार्‍यांचे पदनामांतर करून समकक्ष स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर नियुक्ती देणे, कालबध्द पदोन्नती अंतर्गत पहिला लाभ पदोन्नती साखळीतील वरिष्ठ पदाच्या वेतन श्रेणीचा लाभ देणे, वेतन वाढीचा फरक रोखीने अदा करणे या मागण्या शासनाकडे करण्यात आल्या आहेत. या आंदोलनात लिलाधर पटवर्धन, सुधीर माईणकर, सुहास फुटाणे, नित्यानंद पाटील, शशीकुमार सावंत, शेखर वायंगणकर, नंदकुमार मांजरे, सखाराम नागले उपस्थित होते.