गुहागरमधून गुहा, बागेश्री कासव टॅग करुन समुद्रात; समुद्री प्रवासाचा होणार अभ्यास 

रत्नागिरी:- ऑलिव्ह रिडले कासवांच्या अभ्यासासाठी पहिल्या टप्प्यात पाच समुद्री कासवांना टॅगिंग करून निरीक्षणे नोंदवली गेली होती; मात्र पावसाळ्यात त्यांचा संपर्क तुटला. हाच प्रकल्प पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय कांदळवन कक्षाने घेतला असून दुसऱ्या टप्प्यात गुहागर येथून गुहा आणि बागेश्री ही दोन कासवं टॅग करून सोडण्यात आली आहेत. त्यामुळे समुद्री कासवांच्या अधिवासासह त्यांच्या जीवनमानाचा अभ्यास करणे सोपे होणार आहे.

ऑलिव्ह रिडले टर्टल सॅटेलाइट टॅगिंग प्रकल्पांतर्गत मॅन्ग्रोव्ह फाउंडेशन, महाराष्ट्र वनविभाग रत्नागिरी कार्यालय आणि भारतीय वन्यजीव संस्था यांचा सहयोगातून कासवांचा अभ्यास सुरू केला आहे. २१ फेब्रुवारीला रात्री गुहागर किनाऱ्यावर विशेष पथक लक्ष ठेवून होते. या किनाऱ्यावर घरटे बांधण्यासाठी आलेल्या दोन मादी ऑलिव्ह रिडले कासवांनी घरटे बांधल्यानंतर त्यांना पकडण्यात आले. त्या दोन्ही कासवांवर सॅटेलाइट ट्रान्समीटर बसवण्यात आले आणि २२ फेब्रुवारीला सकाळी दोन्ही कासवं पुन्हा समुद्रात सोडण्यात आली. त्यांची नावे बागेश्री आणि गुहा अशी ठेवली आहेत. त्यांच्यावर मॅन्ग्रोव्ह फाउंडेशन आणि भारतीय वन्यजीव संस्थेमार्फत निरीक्षणे घेतली जाणार आहेत. दोन्ही कासवांचा प्रवास सुरू झाला असून ते कुठे जातात, यावर लक्ष ठेवले जाईल.

या प्रकल्पासाठी गतवर्षी ९ लाख ८० हजार रुपयांची तरतूद केली होती. पहिल्या टप्प्यात जानेवारी, फेब्रुवारी २०२२ ला पाच कासवे सोडली गेली. सहा महिने संपर्कात राहिल्यानंतर त्यांचा संपर्क तुटला. त्यात प्रथमा, सावनी, लक्ष्मी, रेवा आणि वनश्री यांचा समावेश होता. प्रथमा कासव सुरवातीला गुजरातच्या समुद्रात प्रवास करून गेले तर उर्वरित कासवांचा प्रवास हा कर्नाटकच्या दिशेने म्हणजे दक्षिणेकडेच सुरू होता. प्रथमा कासव गुजरातहून पावसाळा सुरू झाल्यानंतर दक्षिण दिशेने सरकू लागले. या कासवाने सर्वाधिक प्रवास केल्याची नोंद झाली आहे. लक्ष्मी कासवांचा संपर्क कमी कालावधीसाठी राहिला; मात्र उर्वरित चारही कासवांचा संपर्क पाच ते सहा महिने होता. मालवण, गोवा, कर्नाटकच्या जवळपास या कासवांचा संपर्क तुटल्याचे अहवालात नमूद केले गेले. यंदा दोन कासवे समुद्रात सोडण्यात आली आहेत. आणखी एक ट्रान्समिटर वनविभागाकडून दिला जाणार असल्याने ते कासव पुढील काही दिवसा सोडले जाण्याची शक्यता आहे.