वाशी मार्केटमध्ये रत्नागिरीच्या हापूसची उपस्थिती अल्पच 

पेटीला साडेतीन हजारापासून आठ हजारांचा दर 

रत्नागिरी:- थंडीचा जोर ओसरुन अचानक वाढलेला उन्हाचा ताप आंब्याला होत आहे. पहिल्या टप्प्यात तयार होत असलेल्या फळाला उन्हाचा चटका बसत असून मोहोराच्या सेटींगवर परिणाम होत आहे. सध्या देवगड, रत्नागिरी हापूसच्या हजार ते बाराशे पेट्या दिवसाला मुंबईतील वाशी मार्केटसह अन्य मुख्य बाजारपेठांमध्ये दाखल होत आहेत. त्यात रत्नागिरी हापूसचा टक्का अल्पच आहे. पेटीचा दर ३५०० ते ८००० रुपये इतका असल्याचे व्यापार्‍यांकडून सांगण्यात आले.

जानेवारी महिन्यात सलग पंधरा दिवस थंडी राहिल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा झाडांना मोठ्याप्रमाणाम मोहोर येण्यास सुरवात झाली. आरंभीला मोहोर कमी राहिल्याने पहिल्या टप्प्यातील उत्पादन १० टक्के आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात बाजारात येणार्‍या आंब्याच्या पेट्यांचे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमाण हे सहा ते सात टक्के आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा हापूसच लवकर बाजारात आला आहे. वाशी बाजार समितीत चार ते सात डझन पेटीचा दर सुमारे साडेतीन हजार ते आठ हजार रुपये आहे. गेल्या दोन दिवसांत एक हजारहून अधिक पेट्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमधून वाशीत पोचल्या. कडाक्याची थंडी ओसरल्यानंतर आंब्याची आवक हळूहळू वेगाने वाढू लागली आहे. मागील तिन ते चार दिवसात उन्हाचा तापही वाढला आहे. उन्हामुळे फळाला लाली येत असून तो बागायतदारांकडून तात्काळ काढला जातो.

रत्नागिरीतील खासगी बागायतदारांनी कातळावरील परिसरात उभारलेल्या तापमापकात ३८ अंशावर पारा चढल्याचे सांगितले. दुपारच्या सुमारास जाणवणार्‍या उन्हामुळे आवळ्याच्या आकाराहून थोडी मोठी कैरी गळून जाते. त्यामुळे सुरवातीच्या उत्पादनात थोडी घट होईल असे बागायतदारांचे मत आहे. तयार झालेला आंबा काढण्यासाठी बागायतदारांकडून घाई केली जात असून पुढील महिन्यात फळांची आवक दुप्पट होणार आहे.

आंब्याची किंमत त्याच्या गुणवत्तेनुसार ठरवली जाते. सामान्य आंब्याची किंमत सुमारे साडेतीन हजार रुपये प्रति पेटी आहे, तर उच्च दर्जाच्या आंब्याची पेटी सुमारे ८ हजार रुपये आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दोन हजाराने दर कमी असल्याचे अनेक व्यापार्‍यांकडून सांगण्यात आले. उन्हामुळे मोहोर येण्याची प्रक्रिया थांबली आहे. मात्र मोहोरातील सेटींगचे प्रमाण कमी राहील असा अंदाज आहे. तसेच थ्रिप्सचे संकट अजुनही टळलेले नाही. अनेक ठिकाणी थ्रिप्सला आळा घालणे बागायतदारांना शक्य झालेले नाही.