दुकानदारांना रेशनकार्ड व्हेरिफिकेशनसाठी वेठीस धरु नये

रेशन दुकानदार संघटनेकडून मागणी

रत्नागिरी:- जिल्ह्यातील रास्तदर धान्य दुकानदारांच्या अनेक प्रश्न प्रशासनाकडून प्रलंबित असतानाच रेशनकार्डचे व्हेरिफिकेशन एकदा झालेले असतानाही तालुका कार्यालयांकडून पुन्हा कार्डधारकांच्या व्हेरिफिकेशनसाठी दुकानदारांना वेठीस धरले जात आहे. याबाबत जिल्हा पुरवठा विभागाला जिल्हा संघटनेकडून निवेदन देण्यात आले असून, दुकानदारांना व्हेरिफिकेशनसाठी वेठीस धरु नये, अशी मागणी करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसिन चालक-मालक संघटनेच्यावतीने याबाबत जिल्हा पुरवठा विभागाला निवेदन देण्यात आले आहे. शासनाकडून आधारकार्ड, केवायसीसाठी प्रत्येक रेशनकार्डधारक व त्यावरील नावांचे व्हेरिफिकेश करण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्यात जवळपास 90 टक्के व्हेरिफिकेशनची कामे दुकानदारांनी पूर्ण करुन दिली आहेत. जी 10 टक्के रेशनकार्डवरील व्यक्ती राहिल्या आहेत. त्यामध्ये बाहेरगावी गेलेले किंवा आजारी असणार्‍या व्यक्तींचा समावेश आहे. हे दहा टक्के व्हेरिफिकेशन करुन देणार असल्याचे दुकानदारांनी सांगितले आहे. परंतु नव्वद टक्के काम झालेले असताना, आता प्रत्येक तालुका पुरवठा कार्यालयाकडून धान्य दुकानदारांना नव्याने व्हेरिफिकेशन करण्याच्या सूचना देण्यात आल्या
आहेत.

रेशन नेण्यासाठी येणार्‍या व्यक्तींकडे एकसारखे कागदपत्रांची मागणी केल्यामुळे दुकानदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्राहकांच्या संतापाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नव्याने व्हेरिफिकेशन तालुका पुरवठा कार्यालयाने करावे, त्यांना रेशनदुकानदार सहकार्य करण्यास तयार असल्याचे जिल्हाध्यक्ष अशोक कदम यांनी सांगितले. मात्र, रेशनदुकानदार नव्याने व्हेरिफिकेशन करणार नाहीत. जे दहा टक्के काम शिल्लक आहे. ते काम दुकानदार पूर्ण करुन देतील असेही कदम यांनी अधिकार्‍यांना निवेदन देताना स्पष्ट केले.

दरम्यान, जिल्हा पुरवठा विभाग व तालुका पुरवठा विभागात समन्वय नसल्यानेच व्हेरिफिकेशनचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे कदम यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत शशिकांत दळवी, विजय राऊत, विकास चव्हाण, चंद्रकांत दळवी, रवी बैकर, दिनेश रिकामे आदी पदाधिकारी होते.