संगमेश्वर डींगणी येथे जंगलात आढळलेल्या महिलेचा खून झाल्याचा संशय

रत्नागिरी:- संगमेश्वर तालुक्यात मच्छी विक्रेत्या महिलेचा संशयास्पद मृतदेह सापडला होता. या महिलेचा खून झाल्याच्या निष्कर्षावर पोलीस पोहचले असून यातील सत्य लवकरच समोर येण्याची शक्यता आहे. 

संगमेश्वर तालुक्यातील डींगणी – करजुवे मार्गावर मच्छि विक्री करणाऱ्या सईदा रिजवान सय्यद ( 50) या महिलेचा मृतदेह जंगल परिसरात आढळला होता. या घटनेने खळबळ उडाली होती. ही घटना 15 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास उघड झाली होती. आता या प्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

सईदा या डिंगणी – करजुवे, पिरंदवणे अशा ४-५ गावामध्ये ही महिला मच्छि विक्री करून कुटुंबाचा उदर निर्वाह करत होत्या. मात्र बुधवार 15 फेब्रुवारी रोजी त्या घरातून सकाळी मच्छि विक्रीसाठी बाहेर पडल्या. मात्र दुपारपर्यंत घरी न आल्याने घरच्यांनी शोधाशोध केल्यानंतर डिंगणी – करजुवे रोडवर जंगलात त्यांचा मृतदेह आढळून आला. जवळपास 30-40 फुटावर ओढत नेऊन निर्जनस्थळी हा मृतदेह टाकण्यात आला होता.  त्यांच्या तोंडावर जोरदार प्रहार करण्यात आला होता. त्यामुळे  चेहरा ओळखणे मुश्किल झाले होते. नातेवाईकांनी लगेचच या घटनेची माहिती संगमेश्वर पोलिसाना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मृतदेह रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला होता. या घटनेचा पोलिस कसून तपास करत आहेत. सईदा यांचा खून करण्यात आला असावा असा पोलिसांनी कयास लावला असून अज्ञतावर भादवीकलम 302, 201 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पथके तयार केली असून आरोपीला लवकरच ताब्यात घेण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.