दहावी, बारावीचे विद्यार्थी परीक्षेच्या तयारीत व्यस्त

रत्नागिरी:- राज्य मंडळातर्फे बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत तर दहावीची परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च 2023 या कालावधीत होत असल्याने विद्यार्थी अभ्यासात व्यस्त झाले आहेत. 
या परीक्षेतूनच विद्यार्थ्यां शैक्षणिक गुणवत्ता सिध्द होते. यावर्षीची दहावी-बारावीची बोर्ड परीक्षा अवघ्या काही दिवसांवर आल्याने विद्यार्थी अभ्यासात व्यस्त झाले आहेत. त्यांना अभ्यासात व्यत्यय येऊ नये, यासाठी पालकांकडून विशेष काळजी घेतली जात आहे.

पाल्याची गुणवत्ता ही पालकांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे. त्यातच दहावीची यावर्षी अखेरची बोर्ड परीक्षा असल्याने आपले पाल्य ऑल क्लिअर होणे गरजेचे आहे, अशी खूणगाठ पालकांनी मनाशी बांधली आहे. त्यामुळे आपल्या मुलाचा अभ्यास झाला पाहिजे, त्याला चांगले गुण मिळावेत, यासाठी पालकांकडून परीक्षापूर्व काळापासूनच विशेष दक्षता घेतली जात आहे.

परीक्षा जवळ आल्याने पाल्य रात्रीचा दिवस करुन अभ्यास करत आहेत. रात्रीचे जागरण, व्यायामाचा अभाव असल्याने आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात. त्या टाळण्यासाठी पौष्टिक आहार, पुरेशी विश्रांती, अभ्यासास पूरक वातावरण या सर्वांचे योग्य वेळापत्रक केले जात आहे. परीक्षा होईपर्यंत आजारपण येऊ नये, यासाठी सकस व समतोल आहारावर भर दिला जात आहे.  अभ्यासास पूरक वातावरण निर्मिती केली जात आहे. घरात मोठ्या आवाजात टीव्ही पाहणे, बोलणे यावरही बंधने आली असून परिसरात गोंधळ होवून शांतता भंग होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर दहावीबोर्ड परीक्षा देणार्‍या पाल्यांच्या घरात तयार झालेल्या माहोलामुळे पालकांचीच कसरत सुरू असल्याचे चित्र आहे.