खेडमध्ये टँकरच्या चाकाखाली सापडून ७५ वर्षीय वृद्धेचा मृत्यू

खेड:- मुंबई – गोवा महामार्गावरील लोटे- माळवाडी येथे टँकरखाली चिरडून ७५ वर्षीय वृद्धेचा जागीच मृत्यू झाला. सावित्री धोंडू कालेकर असे मृत वृद्धेचे नाव आहे. या प्रकरणी टँकरचालक प्रसन्न गजानन पटवर्धन याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टँकरचालक प्रसन्न पटवर्धन हा एम. एच. ४३/वाय २६०५ क्रमांकाचा १० चाकी पाण्याचा टँकर लोटे औद्योगिक वसाहतीतील कारखान्यामध्ये रिकामा करून पुन्हा घराकडे येत होता. याचदरम्यान ७५ वर्षीय वृद्धा रस्त्याने येत होती. अंतर्गत रस्ता अरूंद असल्याने २ वाहने समोरासमोर आल्यास वाहनांना बाजू मिळणे अवघड होते. ही वृद्धा चालत असताना बाजू काढून टँकरचालक पुढे गेला. याचवेळी समोरून आलेल्या कारला जागा देण्यासाठी चालकाने टँकर बाजूला थांबवला.

याचदरम्यान, वृद्धा टँकरच्या डाव्या बाजूने चालत पुढे आली. ही बाब टँकरचालकाच्या लक्षात न आल्याने धक्का लागून खाली पडली. याचवेळी तिच्या अंगावरून पुढचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचे वृत्त कळताच नजीकचे ग्रामस्थ घटनास्थळी पोहचले. लोटे येथील पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक हर्षल हिंगे, पोलीस कॉन्स्टेबल येलकर, पडळकर घटनास्थळी दाखल झाले. वृद्धेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी टँकरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.