गणेशगुळे समुद्रकिनारी सापडली कासवाची तीन घरटी

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे किनाऱ्यावर प्रथमच कासवाची तीन घरटी सापडली आहेत. स्थानिक ग्रामस्थ वनप्रेमी व वनविभागाच्या विशेष प्रयत्नामुळे याला गती मिळण्याची शक्यता आहे.

गेली अनेक वर्ष रत्नागिरी तालुक्यातील गावकरी समुद्रकिनाऱ्यावर कासवे समुद्रकिनारी अंडी घालून आपली प्रजाती टिकवण्याचे काम करीत होते. त्याला स्थानिक कासवप्रेमी व वन विभागातर्फे कासव संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले होते. रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथील एकमेव समुद्रकिनाऱ्यावर कासव संवर्धनाचे काम सातत्याने करत होते. गणेशगुळे गावातील ग्रामस्थ सचिन संदीप तोडणकर यांना २३ दिवसांपूर्वी एक घरटे किनाऱ्यावर सापडले. त्यामध्ये १०५ अंडी सापडली. याची माहिती पोलिसपाटील संतोष लाड, उपसरपंच प्रसाद तोडणकर यांना दिल्यानंतर त्यांनी रत्नागिरी वनविभागाला कळविण्यात आले. त्यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर अंडी संरक्षित करता यावी यासाठी जाळ्या लावण्यात आल्या. ९ फेब्रुवारीला शेखर रामचंद्र तोडणकर यांना एक घरटे सापडले. त्यामध्ये १२५ अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. १० फेब्रुवारीला आणखी एक घरटे याठिकाणी सापडले असून त्यामध्ये ९० अंड्यांचे संरक्षण करण्यात आले आहे. त्यामुळे या समुद्रकिनाऱ्यावर ३२० अंड्याचे संवर्धन करण्याचे काम ग्रामस्थ व वनविभागाच्या वतीने हाती घेण्यात आले. दोन नव्याने सापडण्यात आलेले घरटी एकत्रितपणे एकाच ठिकाणी संरक्षित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यातील घरटी ४९ दिवसानंतर घरट्यातून बाहेर पडण्याची शक्यता आहे.