वेळास समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले सागरी कासवांची 18 घरटी संरक्षित

रत्नागिरी:- मंडणगड तालुक्यातील वेळास समुद्रकिनारी आतापर्यंत ऑलिव्ह रिडले सागरी कासवांची 18 घरटी संरक्षित करण्यात आली आहेत. नोव्हेंबर ते मार्च महिन्यापर्यंत मादी कासवांचा विणीचा हंगाम असतो. या कालावधीत ऑलिव्ह रिडले मादी कासव किनार्‍यावर येऊन वाळूत 1 ते दीड फूट खड्डा काढून अंडी देऊन पुन्हा समुद्रात निघून जातात. गेल्यावर्षी अशी 54 घरटी म्हणजेच अंडी उबवणी केंद्र होती.

 यावेळी मादी कासवाच्या समुद्रातून येण्या-जाण्याच्या मार्गातील अडथळे कमी करण्यासाठी सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त डॉ. अतुल पाटणे यांनी 97 हजार 500 रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
जगात समुद्रात 356 कासवांच्या प्रजाती असून त्यातील 4 ते 5 प्रजाती भारतातील आहेत. त्यातील ऑलिव्ह रिडले ही प्रजाती वेळास येथे आढळते. सुमारे 20 वर्षांपर्यंत या कासवांची अंडी संरक्षित नव्हती. मादी कासव अंडी घालून समुद्रात जात होती. एक मादी 150 ते 200 अंडी घालून समुद्रात जाते ती परत येतच नाही. त्यामुळे समुद्रातून किनार्‍यावर येऊन अंडी घालून समुद्रात जाणार्‍या मादी कासवांसह 55 ते 60 दिवसांत जन्मणार्‍या पिलांना समुद्रात जाईपर्यंत अनेक धोके असायचे. कोल्हे, तरस, पक्षांचा धोका होताच. त्याचवेळी अंडी चोरीस जाण्याचेही प्रकार घडत होते. त्यामुळे 1 हजार अंड्यातून 2 ते 4    पिल्लेच समुद्रात पोहोचू शकता होती.

हा धोका ओळखून सह्याद्री निसर्ग मित्र, वनविभाग, कांदळवन प्रतिष्ठान, स्थानिक ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधी यांनी या कासवांच्या प्रजातीचे संरक्षण होण्यासाठी पुढाकार घेतला. त्यातून सुरक्षित ठिकाणी अंडी उबवणी केंद्र किंवा घरटी संरक्षित केली जाऊ लागली. यावर्षीपासून मत्स्य व्यवसाय विभागानेही या कासवांच्या संवर्धनात प्रत्यक्ष भाग घेतला.

गेल्यावर्षी 54 घरटी संरक्षित करण्यात आली होती. यावर्षी आतापर्यंत 18 घरटी आहेत. त्यामुळे या पुढेही मादी कासव किनार्‍यावर येऊन अंडी घालण्याचा हंगाम बाकी आहे. त्यामुळे यावर्षी झालेल्या उपाययोजनांचा किती फायदा झाला हे पुढील दोन महिन्यात स्पष्ट होणार आहे. गेल्यावर्षीपेक्षा या वर्षी अधिक मादी कासव किनार्‍यावर येवून अंडी घालून जातील. त्यामुळेच पिल्लही अधिक प्रमाणात घरट्यातून बाहेर येवून समुद्रात जातील, असा विश्वास व्यक्त होत आहे.