रोजगार मेळाव्यात परजिल्ह्यातील रोजगाराच्या संधी अधिक; अनेक बेरोजगार तरुण हताश होऊन माघारी

रत्नागिरी:- रत्नागिरीत आयोजित महा रोजगार मेळाव्यात अनेक तरुणांच्या पदरी निराशाच पडली. स्थानिक कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळेल या आशेने आलेल्या तरुणांना मुंबई, पुण्यातील कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी त्या देखील अत्यंत कमी पगारावर उपलब्ध होत्या. परिणामी अनेक तरुणांनी मेळाव्यातून घराचा रस्ता पकडला. स्थानिक कंपन्यांमध्ये नोकरी मिळणार या आशेने आलेले हजारो तरुण हताश होऊन परत गेल्याचे चित्र रविवारी दुपारनंतर पाहायला मिळाले. 

 रत्नागिरीतील शिर्के प्रशालेच्या मैदानावर पहिल्या महा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हजारो तरुणांनी या मेळाव्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणी केली होती. रत्नागिरीतील स्थानिक कंपन्यांमध्ये नोकरी उपलब्ध होईल या आशेने अनेक तरुण रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी रांगेत उभे होते. मात्र, तासंतास रांगेत उभ्या असलेल्या अनेक तरुणांच्या पदरी निराशाच हाती लागल्याचे चित्र रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी दिसून आले. 

रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी कंपन्यांचे स्टॉल उभारण्यात आले होते. यातील बहुतांश स्टॉल पुणे आणि मुंबईतील असल्याचे दिसून आले. यातील काही स्टॉल बंकांचे होते. या बँकांनी सिक्युरिटी गार्डच्या भरतीसाठी देखील स्टॉल लावले होते. परजिल्ह्यातील असलेल्या नोकऱ्या केवळ १३ ते १४ हजार पगाराच्या होत्या. यामुळे इतक्या कामी पगारात परजिल्ह्यात वास्तव्य करायचे कसे असा प्रश्न मेळाव्याच्या ठिकाणी आलेल्या प्रत्येक तरुणाच्या चेहऱ्यावर दिसून आला. 

रोजगार मेळाव्याची संकल्पना चांगली असली तरी या मेळाव्यात स्थानिक पातळीवर असलेल्या रोजगाराच्या संधी फार कमी असल्याचे दिसून आले. स्थानिक कंपन्यांसोबत चर्चा करून या कंपन्यांच्या मार्फत रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे आवश्यक होते मात्र याचाच अभाव या ठिकाणी दिसून आल्याने अनेक तरुणांचा हिरमोड झाला. अनेकांनी परजिल्ह्यातील नोकरीची नियुक्तीपत्र देखील घेतली मात्र, या ठिकाणी प्रत्यक्ष हजर व्हायचे की नाही अशा द्विधा मनःस्थितीत अनेकजण सापडले होते.