महामार्गाच्या कामावरील स्थगिती उठवल्याने कामाला गती

राजापूर:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे. त्यामध्ये राजापूर तालुक्यातील बहुतांश काम पूर्ण झाले असले तरी काही मोजक्या ठिकाणची कामे जमिन मालकांची हरकत, मोबदला, कागदपत्रांची पूर्तता आदी विविध कारणांमुळे विविध कारणांमुळे थांबले होते. मात्र, त्यावर प्रशासकीय पातळीवर योग्य तो तोडगा निघून त्यावरील स्थगितीही उठवण्यात आली आहे. त्यामुळे विविध कारणांमुळे रखडलेल्या ठिकाणी कामाला येत्या काही दिवसांमध्ये सुरवात होणार असल्याची माहिती महसूल प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरणाचा प्रश्‍न मार्गी लागणे आता दृष्टीक्षेपात आले आहे.

                मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात रत्नागिरी जिल्ह्यात खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करण्यात आले आहे. त्यामध्ये राजापूर आणि लांजा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी राजापूर तालुक्यातील १७ तर लांजा तालुक्यातील अशा २८ गावांमधील जागा संपादित करण्यात आल्या आहेत. राजापूर तालुक्यातील समाविष्ट असलेल्या गावांमध्ये वाटूळ, मंदरूळ, ओणी, कासारवाडी, कोंडीवळे, खरवते, नेरकेवाडी, तरळवाडी, कोदवली, कोंड्ये तर्फ राजापूर, उन्हाळे, हातिवले, कोंड्येतर्फे सौंदळ, पन्हळे व तळगाव या गावांचा समावेश आहे तर, लांजातील लांजा, मठ, कडूगाव, कुर्णे, पानेरे, देवधे, देवधे बौद्धवाडी, पुरगाव, कुवे, वाकेड व आंजणारी अशा ११ गावांचा समावेश आहे. राजापूर तालुक्यातील चौपदरीकरणाच्या कामाचा विचार करता ग्रामिण भागातील बहुतांश रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, उन्हाळे, हातिवले, कोदवलीसह शहरातील तीन-चार ठिकाणची कामे हरकती, लवाद, कागदपत्रांची अपूर्तता, मोबदला आदी विविध कारणांमुळे रखडलेले आहे. त्यावर प्रशासकीय स्तरावर योग्य तो तोडगा काढण्यात यश आले आहे. त्यामुळे ज्या ठिकाणची कामे रखडलेली होती त्या ठिकणच्या कामांना येत्या काही दिवसांमध्ये पुन्हा आरंभ होऊन ही कामे मार्गी लागतील अशी माहिती महसूल प्रशासनाकडून देण्यात आली आहे.