शशिकांत वारिशे मृत्यूप्रकरणी आरोपीवर पत्रकार कायद्यान्वयेही कारवाई: ना. सामंत

रत्नागिरी:- राजापूर येथे दुचाकीला धडक देऊन ठार मारल्याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल असलेल्या रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर याच्यावर पत्रकार कायद्यान्वयेही कारवाई करण्यात येणार असून या गंभीर घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांकडे सोपवण्यात आला असल्याची माहिती रत्नागिरीचे पालकमंत्री व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. या घटनेला जबाबदार असणार्‍या गुन्हेगारांना पाठिशी घातले जाणार नाही पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या कुटुंबियांच्या पाठिशी सरकार असून त्यांच्यासाठी जे करणे शक्य आहे ते सर्व केले जाईल असेही ना. सामंत यांनी स्पष्ट केले.

रत्नागिरी दौर्‍यावर आलेल्या पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की झालेली घटना अत्यंत गंभीर आहे. हा प्रकार समजल्यानंतर आपण तात्काळ याची माहिती घेतली व पोलिसांनी गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्याची सूचना केली. या प्रकरणाची आपण सातत्याने माहिती घेत आहोत. रिफायनरीला पाठिंबा किंवा विरोध हा लोकशाही मार्गाने मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार असून तो मांडू शकतो. परंतु ही घटना अत्यंत वाईट आहे. घटना घडल्यानंतर पोलिसांनी संबंधित गुन्हेगारावर तात्काळ गुन्हा  दाखल करुन कारवाई केली. मिळालेल्या प्राथमिक पुराव्यांमध्ये हा प्रकार जाणिवपूर्वक करण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर यात लागलीच खुनाचा गुन्हा दाखल करताना 302 कलम लावण्यात आले आहे.

या प्रकरणात सखोल चौकशी केली जाणार आहे. पत्रकार कायद्यांतर्गत शासन निर्देशाप्रमाणे आता पुढील कारवाई होणार असून, याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांकडे तपास सोपवण्यात आला असल्याची माहितीही ना. सामंत यांनी दिली.

संशयित पोलीस कोठडीतून जिल्हा रुग्णालयात
पोलीस कोठडीमध्ये असलेला संशयित पंढरीनाथ आंबेरकर याला छातीत दुखू लागल्याने आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने त्याला बुधवारी दुपारनंतर जिल्हा रुग्णालयात पोलिसांच्या बंदोबस्तात उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. याप्रकरणात पोलीस यंत्रणा आता पुरावे गोळा करु लागली आहे.