पावस परिसरात १३२ ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेऱ्यांचे जाळे 

पावस:- पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील २२ गावांमध्ये प्रमुख रस्ते मंदिरे व मशिद अशा १३२ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या माध्यमातून चोरी व गुन्हेगारीबरोबर अपघातांवरही पोलिसांची नजर राहात असल्याने वाहनचालकही सावधतेने वाहने चालवू लागले आहेत. त्यामुळे उर्वरित ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.

 पोलिस अधीक्षकांच्या माध्यमातून ऑपरेशन नेत्रा या कार्यक्रमांतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची संकल्पना मांडण्यात आली. त्याला पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याच्या २२ गावांमध्ये चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. या कॅमेरांमुळे परिसरावर लक्ष राहात असल्याने चोऱ्या, अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच पूर्णगड पोलिसांना गुन्हेगार शोधण्यासही मदत होत आहे. पावस, कोळंबे, गोळप, चांदोर, नाखरे, मावळंगे, गावखडी, पूर्णगड, गणेशगुळे, मेर्वी, कुर्धे, फिनोलेक्स व पूर्णगड जेटी या ठिकाणी सागरी सुरक्षा अंतर्गत कॅमेरे बसवण्यात आले आहेत. एकूण ११५ कॅमेरे बसवण्यात आले. त्याशिवाय या हद्दीमध्ये एकूण ८६ मंदिर आहेत. त्यापैकी तेरा मंदिरांमध्ये कॅमेरे बसवण्यात आले आहेत. गावखडीमध्ये येत्या काही दिवसात कॅमेरे बसले जाणार आहेत. एकूण १३२ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून परिसरावर लक्ष ठेवले जाणार आहे.