लांजात कचरा टाकण्यावरुन मामाकडून भाच्याला मारहाण

लांजा:– सामायिक जागेमध्ये गवत व पालापाचोळा टाकल्याच्या रागातून मामाने भाच्याला काठीने मारहाण केल्याची घटना नांदिवली  येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी मामाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  नांदिवली मुस्लीम मोहल्ला येथे साडेदहा एकर जमीन आहे. त्यामधील मुदस्सर अब्दुल रहीम ठाकूर ( २७, रा . लांजा मुजावरवाडी ) याच्या आईला आजोबांनी बक्षीसपत्राने दोन एकर जमीन दिली आहे. या जमिनीमध्ये मुदस्सर व त्याचे वडील यांनी आंबा, काजू यांची लागवड केली आहे . या जागेमध्ये आंजणारी येथील मजूर कामगारांकडून गवत कापण्याचे व साफसफाई काम सुरू आहे. हे कापलेले गवत व पालापाचोळा पडीक जमिनीमध्ये टाकण्यात आला होता . बुधवारी सकाळी मामा अय्युब इब्राहीम संग्रार (५२, रा . नांदिवली, लांजा) यांनी कामगाराला पाठवून टाकलेले गवत व पालापाचोळा उचलून टाक असा निरोप पाठवला. त्यानंतर अय्युब हा मुदस्सर काम करीत असलेल्या ठिकाणी आला. दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि रागातून मारहाण केली. हेडकॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे हे तपास करीत आहेत.