गुहागरामध्ये एस. टी. बसच्या चाकाखाली चिरडून वृद्धेचा मृत्यू

गुहागर:- तालुक्यातील नवानगर मोहल्ला येथे दुर्दैवी घटना घडली आहे. एस. टी. बसच्या चाकाखाली चिरडून एका 65 वर्षीय वृध्द महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार 2 फेब्रुवारी रोजी सकाळी घडली. मालती विठू रोहीलकर (वय 65, रा. नवानगर ) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर चंद्रकांत लक्ष्मण सकपाळ (54, चिखली कदमवाडी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या एस. टी. बस चालकाचे नाव आहे. 

सविस्तर वृत्त असे की, चंद्रकांत सकपाळ हे गुरुवार 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 च्या दरम्यान आपल्या ताब्यातील गुहागर धोपावे मार्गे वेलदूर ही एस. टी. (एमएच 14 बीटी 2970) घेऊन जात होते. ही बस नवानगर मोहल्ला येथे थांबली. प्रवासी उतरताच एस.टी. बस पुन्हा सुरु झाली. इतक्यात पायवाटेवरुन मालती विठू रोहीलकर या अचानक रस्त्यावर आल्या. एस.टी.चालकाला अचानक समोर आलेली महिला दिसली नाही. त्यामुळे एस.टी.ची धडक मालती याना बसली व त्या एस.टी. च्या चाकाखाली सापडल्या आणि यातच त्यांचा चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी एस. टी. बस चालक चंद्रकांत सकपाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.