नव्या सायबर पोलीस स्थानकात थेट स्विकारणार तक्रार

रत्नागिरी:- जिल्ह्यात पहिल्या सायबर पोलिस ठाण्याचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. यापूर्वी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सायबर लॅब ची तांत्रिक मदत घेतली जात होती; मात्र एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया कार्यान्वित नव्हती. त्यासाठी नियमित पोलीस स्थानकातच तक्रार द्यावी लागत होती. मात्र आता पहिले सायबर पोलिस ठाणे जिल्ह्यात सुरू झाले. त्यामुळे आता थेट या पोलिस ठाण्यात सायबर गुन्ह्यांची नोंद करता येणार असून, त्याचा तपास अधिक गतिमान होणार आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पहिली नोंद करून या दैनंदिनीचा आरंभ केला.

जिल्ह्यामध्ये दाखल होणार्या विविध सायबर गुन्ह्यांचा तपास गतीमान होणार आहे. जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांना तांत्रिक मदत पुरवण्यासाठी १५ जानेवारी २०१६ ला पोलिस सायबर लॅब कार्यान्वित करण्यात आली होती. सायबर पोलिस ठाण्यात यापूर्वी एफआयआर  व गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया कार्यान्वित नव्हती; मात्र दि. २६ जानेवारी २०२३ ला भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत सायबर पोलिस ठाण्यातच गुन्हे नोंद करण्याचा आरंभ करण्यात आला. जिल्ह्यातील सायबर पोलिस ठाणे हे सीसीटीएनएस प्रणालीमध्ये जोडून जनसेवेसाठी लोकार्पण करण्यात आले. यापूर्वी जिल्ह्यामध्ये १८ पोलिस ठाणे होती. आता या सायबर पोलिस ठाण्याचा समावेश होऊन त्यांची संख्या १९ इतकी झाली आहे.या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे, पोलिस उपअधीक्षक आाधिक्षक गुन्हे शाखा राजेश कानडे, पोलिस निरीक्षक तथा पदभार पोलिस उपअधीक्षक सुदाम माने, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंतकुमार शहा, विशेष शाखेच्या निरीक्षक निशा जाधव, शहर पोलिस निरीक्षक विनीत चौधरी, ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक मारूती जगताप, रमेश निकम, सायबर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नितीन पुटळकर, मनोज सावंत यांच्यासह पोलिस अधिकारी, अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी उपस्थित होते.