कुवारबाव येथे आरसीसी पीलरचा उड्डाणपूल; बाजारपेठेतील व्यावसायिकांना दिलासा 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आश्वासन 

रत्नागिरी:- रत्नागिरी -कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणांतर्गत कुवारबाव येथे होणार्‍या वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून आरसीसी पीलरचा उड्डाणपूल उभारण्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. कुवारबाव येथे भराव टाकुन एक किलोमीटरचा पुल उभारल्यामुळे बाजारपेठेतील व्यावसायिकांचे होणारे नुकसान मंत्री गडकरींच्या आदेशाने टळणार आहे.

केंद्रीयमंत्री गडकरी यांच्याशी कोल्हापूर येथे बैठक घडवून आणण्यासाठी राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला. शनिवारी (ता. 28) कोल्हापूर विमानतळ येथे कुवारबाव व्यापारी संघाचे प्रतिनिधी व ग्रामस्थांशी केंद्रीयमंत्री गडकरी यांनी संवाद साधला. यावेळी व्यापारी संघांचे अध्यक्ष निलेश लाड, कार्याध्यक्ष हितेंद्र पटेल, उपाध्यक्ष राजेश तोडणकर, प्रभाकर खानविलर, दर्शन पवार यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. कुवारबाव येथील समस्येविषयी निवेदन दिले.
रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणांतर्गत मिरजोळे रेल्वेस्टेशन ते कुवारबाव पाटबंधारे बस थांबा दरम्यान होणारा रस्ता (उड्डाणपूल टाइप) पूर्णत: भरावाचा सुमारे सहाशे मीटरचा केला जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे. भरावाचा पुल झाला तर कुवारबाव बाजारपेठेचे भवितव्य धोक्यात येणार आहे. रत्नागिरी शहर आजूबाजूच्या परिसरात विस्तारले जात आहे. त्यामुळे कुवारबाव बाजारपेठेतील सुमारे अडीचशेहून अधिक व्यावसायिकांना फटका बसू शकतो. बाजारपेठ उठली तर नागरिकांचीही गैरसोय होणार आहे. त्यासाठी भरावाचा पुल न उभारता या ठिकाणी आर. सी. सी. पिलर्सचा उड्डाण पूल उभारला जावा अशी मागणी कुवारबाव व्यापारी संघातर्फे करण्यात आली आहे. यावर मंत्री गडकरी यांनी तात्काळ राष्ट्रीय प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांना सुचना दिल्या आहेत. त्यामुळे बाजारपेठेतील व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. तसेच येथे पुला उभारल्यामुळे वाहतूक कोंडीवर कायम उपाय होईल. सकाळी दहा ते दुपारी बारा आणि सायंकाळी सहा ते रात्री आठ वाजण्याच्या कालावधीत कुवारबाव येथे रस्ता पार करणेही अवघड होते. वाहने चालवतानाही अडचणी निर्माण होतात. आरसीसी उड्डाणपुलामुळे या समस्या सुटणार आहेत.
महामार्गासाठी भूसंपादन करण्यात आलेल्या काही जमीन मालकांना सातबार्‍यावर नाव असून मोबदला दिलेला नाही. संबंधित कार्यालयातील अधिकार्‍यांना पत्राद्वारे कळविण्यात आले होते, तरीही याबाबत समर्पक माहिती दिलेली नाही. कुवारबावचे झपाट्याने शहरीकरण होत आहे. त्यामुळे तेथील जमिनीचे बाजारमूल्य वाढलेले आहे. तुलनेत शासनाचा रेडी रेकनरचा दर अत्यंत अल्प आहे. महामार्गासाठी भूसंपादन करण्यात आलेल्या जमिनीचे मुल्यांकन जुन्या रेडी रेकनरने करण्यात आले आल्यामुळे प्रकल्पात बाधित जमीन मालकांवर अन्याय झाला आहे. याचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा अशी मागणी केली आहे.