शिक्षक बदल्यांच्या पाचव्या टप्प्याची यादी दोन दिवसात जाहीर होणार 

रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांच्या पाचव्या टप्प्यासाठी बदली पात्र ठरलेल्या ८७१ पैकी ८६५ शिक्षकांनी बदलीसाठी ऑनलाईन पोर्टलवर अर्ज भरले आहेत. येत्या दोन दिवसात बदल्याची यादी जाहीर होणार आहे. मागील चारही टप्प्यांमध्ये बदलीसाठी पात्र ठरलेल्या शिक्षकांपैकी प्रत्यक्ष बदलीसाठी ऑनलाईन अर्ज भरणार्‍यांचा टक्का कमी आहे.

दिव्यांग, दुर्धर आजारी, विधवा, परितक्त्या या संवर्ग १, पती-पत्नी एकत्रीकरण संवर्ग २, बदली अधिकार पात्र ठरलेल्या शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पुर्ण झाली आहे. सुगम क्षेत्रात दहा वर्षे आणि शाळेत सलग पाच वर्षे काम केलेले शिक्षक बदली पात्रमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यांची यादी तयार करण्यात आली होती. बदलीसाठी त्या शिक्षकांना ऑनलाईन पोर्टलवर शाळा विकल्प भरावयाचे होते. शासनाच्या नवीन निर्देशानुसार एक ते तिस पैकी कितीही शाळांची नावे बदलीसाठी भरता येत होती. त्याप्रमाणे शिक्षकांनी दिलेल्या मुदतीमध्ये विकल्प ऑनलाईन भरले. पात्र ठरलेल्या एकुण शिक्षकांपैकी ९८.८२ टक्के शिक्षकांनी विकल्प भरले आहेत. २ शिक्षकांनी अर्ज भरले परंतु ते ऑनलाईन सबमिट झाले नाहीत. चार शिक्षकांनी बदली प्रक्रियेत समावेशच घेतलेला नाही. या शिक्षकांच्या बदल्यांची यादी दोन दिवसात जाहीर होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आली. दरम्यान, ज्या शिक्षकांना पसंतीच्या शाळा मिळालेल्या नाहीत, त्यांच्यासाठी बदल्यांची प्रक्रिया पुढे सुरु राहणार आहे.