वेळास समुद्रकिनारी समुद्राकडे झेपावणाऱ्या कासवांचा मार्ग होणार सुकर 

रत्नागिरी:- मंडणगड तालुक्यातील वेळास समुद्रकिनार्‍यावर येणार्‍या ऑलिव्ह रिडले मादी कासवांचा आणि किनार्‍यावर जन्म घेऊन समुद्रात जाणार्‍या पिल्लांचा प्रवास आता पूर्णपणे सुरक्षित झाला आहे. सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त डॉ. अतुल पाटणे यांनी समुद्रासह किनार्‍यावरील सुरक्षिततेच्या उपाययोजनेसाठी 97 हजार 500 रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. यातून रत्नागिरी आणि रायगड सहाय्यक मत्स्यव्यवसाय विभागाच्या पथकांनी यंदा प्रथमच पुढाकार घेवून ऑलिव्ह रिडले कासव पिल्लांसह मादी कासवांचे जीवन सुरक्षित केले.

सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त डॉ. अतुल पाटणे यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून 3 कि.मी. अंतराच्या वेळास किनार्‍यासह समुद्रात अडकून पडलेल्या मासेमारी जाळ्यांचे तुकडे (घोस्ट जाळी), काचा, प्लास्टिक काढून घेतले. यासाठी द डाईव्ह शॅक कंपनीच्या पाणबुड्यांची मदत घेण्यात आली. समुद्रातील लो टाईड पासून 1 कि.मी. आतील समुद्र पाणबुड्यांच्या मदतीने स्वच्छ करण्यात आला. त्याचबरोबर ज्या ठिकाणी कासवांच्या अंड्यांचे संरक्षण केले जाते तो 3 कि.मी. चा समुद्रकिनारासुद्धा स्वच्छ करण्यात आला. त्यामुळे आता अंडी घालण्यासाठी किनार्‍यावर येवून समुद्रात जाणार्‍या मादी कासव आणि जन्मणार्‍या पिल्लांची सुरक्षितता निर्धारित झाली आहे.

समुद्रातील जाळ्यांच्या तुकड्यांमध्ये, काचांमध्ये किनार्‍यावरील प्लास्टिकच्या वस्तू, लाकडाचे ओंडके अशा अडथळ्यांतून समुद्रात जाणार्‍या पिल्लांना अडथळे निर्माण होतात. या अडथळ्यातून जाताना पिल्ले जखमी होऊन मृत्यू होण्याची भिती असते. मात्र आता ही भिती फारच कमी झाली आहे. कासव संवर्धनासाठी प्रथमच मत्स्यव्यवसाय विभागाकडून अशाप्रकारचा क्रियाशील पुढाकार घेण्यात आला आहे. या कामी कासव मित्र विरेंद्र पाटील, वनसरंक्षक ओंकार तळेकर, होम स्टे अध्यक्षा धनश्री काणे, मच्छीमार प्रतिनिधी जनार्दन कुलापकर, वेळास येथील स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांची मोलाची मदत झाली. कासवांच्या सुरक्षिततेसाठी होणार्‍या उपाययोजना करताना रत्नागिरी सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त नागनाथ भादुले, प्रशिक्षण अधिकारी जीवन सावंत, विकास अधिकारी संतोष देसाई, परवाना अधिकारी तृप्ती जाधव तसेच भक्ती पेजे, उत्कर्षा कीर, स्वप्नील चव्हाण, प्रतिक महाडवाला, चंद्रकांत वैद्य, तुषार वाळुंज, महादेव नांदोस्कर, होर्टे यांच्यासह रायगड मत्स्यव्यवसाय विभागाच्या टिमने प्रत्यक्ष सहभाग घेतला.

वेळास समुद्रकिनारी दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च महिन्यांमध्ये ऑईव्ह रिडले या संरक्षित कासव प्रजातीचा विणीचा हंगाम असतो. या कालावधीत मादा कासव किनार्‍यावर वाळूत खड्डे काढून अंडी घालून पुन्हा समुद्रात जातात. वाळूत 1 ते दीड फूट खड्डा काढून 1 कासव मादी सुमारे 200 ते 250 अंडी घालते. यानंतर 58 ते 60 दिवसांनी पिल्लांचा जन्म होतो. ही जन्मलेली पिल्ले समुद्रनाच्या दिशेने जाताना त्यांना पक्षी, कोल्हे, कुत्रे, तरस यांचाही धोका असतो. त्यामुळे कासवमित्र आणि वनविभागाने ग्रामस्थांच्या मदतीने कासवांनी घातलेली अंडी सुरक्षितस्थळी वाळूत खड्डा काढून त्याची घरटी बनवून ठेवली जातात. जशी पिल्ले बाहेर येतील तशी कासव मित्र, वनविभाग आणि ग्रामस्थांकडून समुद्रापासून 50 ते 100 मीटर अंतरावर नेवून ठेवली जातात. ही पिल्ले समुद्रात जाताना त्यांना आता कुठल्याही अडथळ्यांचा धोका राहिलेला नाही. त्यामुळे कासव संवर्धन योग्यरितीने होण्यास मदत होणार आहे.