गुहागर:- गुहागर तालुक्यातील साखरीआगर गावात अत्यंत दुःखद घटना घडली आहे. जेली चॉकलेट घशात अडकल्याने नऊ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रिहांश तेरेकर असे मृत बाळाचे नाव आहे.
या घटनेनंतर रिहांशला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले मात्र, त्यापूर्वीच त्याने आपला जीव गमावला होता. याप्रकरणी गुहागर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. जेली चॉकलेट घशात अडकल्याने बाळाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात आलं आहे. नातेवाईकांनी बाळाला उपचारासाठी नजीकच्या डॉक्टरकडे नेले.
दरम्यान, नातेवाईक घोणेसरे येथे दवाखान्यात बाळाला घेऊन जात असतानाच वाटेत बाळाचा मृत्यू झाला. श्वास घेता न आल्याने बाळाचा तडफडून मृत्यू झाला. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून, स्थानिक पोलीस देखील या प्रकरणाची सविस्तर तपासणी करत आहेत.
दरम्यान, पालकांनी आपल्या मुलांना कोणतं चॉकलेट देत आहोत, तसेच ते चॉकलेट खाण्यायोग्य ते बाळ आहे की नाही, या गोष्टींकडे लक्ष ठेवणं गरजेचं असल्याचं या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आलं आहे. त्यामुळे पालकांनी देखील काळजी घेणे गरजेचे आहे.