आता विधवा नाही ‘परिपूर्णा’ म्हणण्याचा निर्णय

कुणबी समाज सेवा संघाचा कार्यक्रम ; तेरा महिलांचे ओटी भरुन औक्षण

रत्नागिरी:- विधवा हे संबोधन न करता तिला ‘परिपूर्णा’ असे नामकरण करण्याचा निर्णय नाचणे येथील कुणबी समाज सेवा संघाने आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. यावेळी महिलांचे प्रबोधन, विधवा महिलांच्या बाबतीत समाजात असणारे समज-गैरसमज, अनावश्यक रुढी यावर तज्ज्ञांमार्फत संवादही साधण्यात आला. तसेच तेरा परिपूर्णा महिलांची ओटी भरुन औक्षण करण्यात आले.

नाचणे येथील कुणबी समाज सेवा संघ या सामाजिक संस्थेतर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष व संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून विविध समाज प्रबोधनाचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. २५ डिसेंबरला महाआरोग्य शिबिराचे आयोजन करून त्याचा लाभ परिसरातील मंडळाना देण्यात आला. त्यानंतर तिळगूळ समारंभ व हळदी कुंकू कार्यक्रम झाला. स्वराज जननी जिजामाता, स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले तसेच लोकनेते शामरावजी पेजे यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. या उपक्रमाला महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. श्रीमती सावंत यांनी पतींचे संरक्षण संपले असताना मागे राहिलेली पत्नी, कोणाची तरी आई, बहिण, आजी, आत्या, मावशी असते. तिने समाजाची भिती न बाळगता खंबीरपणे उभे राहले पाहीजे असे सांगितले. यापुढे विधवा हे संबोधन न करता तिला परिपूर्णा असे नामकरण करण्याचा निर्णय कार्यक्रमात घेण्यात आला. यावेळी समाजातील व परिसरातील अशा परिपूर्णा महिलांच्या सन्मानाचे आयोजन संघातर्फे करण्यात आले. तेरा महिलांचा त्यांची ओटी भरुन औक्षण करत सन्मान करण्यात आला. तसेच हळदी कुंकूही लावण्यात आले. या कार्यक्रमाला महिलांचा सहभाग उत्स्फूर्त होता.

या कार्यक्रमाला जिल्हा आंबा व्यावसायिक संघाचे अध्यक्ष प्रदिप सावंत, विकास पेजे, अनंत ढेपसे, उपाध्यक्ष कैलास सोलकर, मिनल नागले, अमित गावडे, सौ. शुभांजली पेजे, सौ. वंदना पेजें, सौ. स्वाती पालकर, रुपाली गावडे, निमा सुवरेवहिनी, पुजा खामकर, मयुरी केळकर, मांडवकर काकी, शितल आग्रे, अश्विनी ढेपसे, अभिषेक पेजे, राजेंद्र खापरे यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी, महिला मंडळ यांचे चांगले सहकार्य लाभले.