रत्नागिरी:- तालुक्यातील पाली-देवतळे रस्त्यावर वाहनाचा तसेच गुरे वाहतूक करण्याचा परवाना नसताना गुरे वाहतूक करणाऱ्याला ग्रामीण पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने ५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
शशांक संजय सावंत (रा. साठरेबांबर- सावंतवाडी, रत्नागिरी) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना २६ डिसेंबर २०२२ या कालावधीत पाली देवतळे रस्त्यावर घडली होती. शशांक सावंतकडे गाडी चालवण्याचा परवाना नसताना पिकअप वाहन ( एमएच- ०८डब्ल्यू -३६३१) मधून गुरे वाहतूकीचा परवाना नसताना गाडीमध्ये तीन बैल गाडीचे हौद्यात दोरीने बांधुन त्यांना खाद्य अगर पाणी न देता बैलांना गाडीमध्ये वेदना किंवा यातना होतील अशा रितीने दोरीने बांधून त्यांची पशु वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून कोणत्याही प्रकारे तपासणी न करता वाहतूक करत असताना सापडला. ३ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला होता. या प्रकरणी सहायक पोलिस फौजदार मोहन कांबळे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तपासात पोलिसांनी संशयिताला अटक करुन न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. बुधवारी हा खटला दुसरे न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात झाला. सरकारी पक्षातर्फे ऍड.प्रज्ञा तिवरेकर यांनी काम पाहिले. न्यायालयाने आरोपीला ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हेड कॉन्स्टेबल दुर्वास सावंत, संजीवनी मोरे यांनी काम पाहिले.