३३व्या महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेत रत्नागिरी पोलिसांना ७ सुवर्ण, ३ कास्य पदक 

रत्नागिरी:- पुणे येथील एसआरपीएफ, गट-१ व २, वानवडी येथे झालेल्या ३३व्या महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेत, रत्नागिरी जिल्हा पोलिसदलातील महिला पोलिस स्पर्धकांनी वैयक्तिक कामगिरीत एकूण ७ सुवर्ण, ३ कास्यपदके प्राप्त केली. तसेच सांघिक स्पर्धेत कोकण परिक्षेत्रामधून १ सुवर्ण व १ कास्यपदक प्राप्त केले. या स्पर्धेत रत्नागिरी पोलिस दलातील पोलिस मुख्यालयातील महिला पोलिस कॉंन्स्टेबल मंजिरी रेवाळे यांनी ३ सुवर्णपदके प्राप्त करून सर्व स्पर्धकांमध्ये सरस ठरत बेस्ट अॅथलेटिक्स प्लेअर अॅवॉर्ड २०२३ प्राप्त करून रत्नागिरी पोलिसदलाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.

या स्पर्धेतील १०० मीटर धावणे या प्रकारात पोलिस मुख्यालयातील महिला पोलिस कॉन्स्टेबल मंजिरी रेवाळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला तसेच ५.३७ मीटर लांबीची उडी मारून नवीन स्पर्धा पराक्रम नोंदवला तसेच १०० मीटर रिलेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. २००, ४०० मीटर धावणेमध्ये पोलिस मुख्यालयातील महिला पोलिस कॉन्स्टेबल अमृता वडाम यांनी प्रथम, शंभर मीटर धावणेमध्ये पोलिस मुख्यालयातील महिला पोलिस शीतल पिंजरे यांनी धावणे तसेच उंच उडीमध्ये १.६५ मीटर उंच उडी मारून प्रथम क्रमांकासह नवीन पराक्रम नोंदवला. कुस्ती प्रकारात ५७ किलो वजनी गटात खेड पोलिस ठाण्याच्या तेजस्विनी जाधव यांनी तृतीय क्रमांक, तर वेटलिफ्टिंग ५५ किलो वजनी गटात पोलिस मुख्यालयातील महिला पोलिस हेडकॉन्स्टेबल पूजा गायकवाड यांनी तृतीय क्रमांक पटकावला. बॉक्सिंग ७५ किलो वजनी गटात मुख्यालयातील पोलिस कॉन्स्टेबल बालाजी धेंबरे यांनी तृतीय क्रमांक तर ११० मीटर धावणेमध्ये पोलिस कॉन्स्टेबल रोहित मांगले तृतीय तसेच सांघिक कामगिरीमध्ये कोकण परिक्षेत्रातर्फे खेळताना कबड्डी पुरुष संघाकरिता १ सुवर्णपदक व खो-खो महिला संघाकरिता १ कास्यपदक प्राप्त केले आहे.