हायटेक बसस्थानकाच्या कामाला मिळाली गती

वाढीव ७ कोटी देण्याचा निर्णय ; प्रवाशांचा ताप कायम

रत्नागिरी:- रखडलेल्या हायटेक एसटी बसस्थानकाच्या कामाला आता गती मिळाली आहे. ठेकेदाराने कामगार वाढवल्याने पिलरच्या भोवती भराव टाकून घेण्याचे काम जोरदार सुरू आहे. सुमारे १० कोटीचे काम होते; परंतु कोरोना काळात हे काम थांबल्याने कन्स्ट्रक्शन किंमत वाढल्याने वाढीव रक्कमेसाठी ठेकेदाराने काम थांबवले होते. मंत्री उदय सामंत यांच्या पुढाकारामुळे वाढीव ७ कोटी देण्याचा निर्णय झाल्यानंतर आता कुठे काम दिसू लागले आहे.  

रत्नागिरीकरांच्या नवीन हायटेक एसटी बसस्थानकाबाबतचे काम तसे वादग्रस्त ठरले. कोल्हापूरच्या ठेकेदाराने हे काम घेतले होते; परंतु कंत्राटदाराने एसटी बस स्थानकाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. नागरिकांसह सर्वच प्रवाशांना बराच त्रास सहन करावा लागला आहे. काम लवकरात लवकर सुरू व्हावे यासाठी अनेक उपोषणे, आंदोलने, मोर्चे निघाले; मात्र यावर तोडगा निघत नव्हता. माजी परिवहनमंत्री अनिल परब यांनी हे बसस्थानक लवकरच पूर्ण होईल, असे आश्वासन दिले होते; मात्र याबाबत प्रत्यक्षात काहीच झाले नाही. मंत्र्यांच्या आदेशालाही ठेकेदाराने न जुमानता काम अर्धवट ठेवले होते. त्यामुळे जनता त्रस्त होती. सध्या एसटीची वाहतूक ही रहाटाघर बसस्थानकातून होत आहे. त्यामुळे प्रवासी बसस्थानकासमोरील सारस्वत बँकेसमोरील स्टॉपवर उभे राहून गाडीची वाट पाहत राहतात. परिणामी, या ठिकाणी गाड्या थांबल्यानंतर तेथे प्रचंड गर्दी होते. वाहतुकीची कोंडीही होते. जवळच शाळा असल्यामुळे मुलांचीही या ठिकाणी गर्दी वाढते. सायंकाळच्या वेळी कामावरून सुटणारे कामगार, शासकीय कर्मचारी या ठिकाणी बसची वाट पाहत असतात. या साऱ्याचा विचार करून एसटी बसस्थानक पूर्णत्वास जाण्यासाठी एसटी प्रशसनाकडून प्रयत्न करण्यात येत होते. ठेकेदाराने एसटी महामंडळाला वाढीव रकमेचे पत्र दिले होते. पालकंत्री उदय सामंत यांनी ठेकेदाराचे म्हणणे ऐकून घेऊन ७ कोटी वाढीव निधी मंजूर केला. त्यानंतर ठेकेदाराने कामाला सुरवात केली. गेले काही दिवस कासवाच्यागतीने काम सुरू होते; मात्र आता त्याला गती मिळाली आहे.