जिल्ह्यात थंडीचा कडाका; पारा १६ अंशांवर

पिकांवर रोगांचे संकट

रत्नागिरी:- राज्यासह जिल्ह्यात थंडीची लाट आल्याने सर्वत्र हुडहुडी भरली आहे. पहाटेच्या सुमारास पारा प्रचंड घसरत आहे. गुरुवारी रत्नागिरी जिल्ह्याचा पारा १६ अंशांवर आला होता. गेल्या काही वर्षात प्रथमच पारा खाली घसरला आहे.याचा आंब्याला काही प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र  वाढत्या थंडीचा शेती पिकांवर  देखील परिणाम होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.  

जिल्ह्यात मागच्या ४ दिवसांपासून तापमानात मोठी घट झाल्याने सर्वत्र थंडीचा कडाका पडला आहे. आजही तापमान १६ अंशावर असल्याने जिल्हाभरात कडाक्याची थंडी पडली आहे. पहाटेपासूनच गार वारे सुटत असून हुडहुडी वाढली आहे. त्यामुळे सकाळी माँनिंग वॉकला जाणार्‍यांची संख्या ही घटली असून शाळकरी मुलं, वृद्धांना या थंडीचा जास्त त्रास होत आहे. उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात कोकणातही तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. येथील अनेक जिल्ह्यात तापमान १० अंशाच्या खाली गेले आहे. त्यामुळे चांगलीच हुडहुडी वाढली आहे. या वाढत्या थंडीचा परिणाम शेतकर्यांच्या पिकांवर देखील होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. काही शेतकर्यांची रब्ब पीक या वाढत्या थडीमुळे धोक्यात आली आहे. पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे.