शिमगोत्सवापूर्वी महामार्गाचे काम पूर्ण न केल्यास आंदोलनाचा इशारा

रत्नागिरी:- मुंबई गोवा महामार्गाचे काम अनेक वर्षे रखडले असून, त्यामुळे कोकणात येणार्‍या चाकरमान्यांबरबरच प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. या महामार्गाचे काम पूर्ण करावे, या मागणीसाठी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकणवासियांनी एकत्र येऊन मुंबई – गोवा महामार्ग ध्येयपूर्ती समितीची स्थापना केली आहे. या महामार्गाचे काम शिमग्याआधी पूर्ण न केल्यास स्त्यावर उतरून आंदोलनाची तयारी समितीने केली आहे.

मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण व्हावे यासाठी सामाजिक, राजकीय संघटनांनी अनेक वेळा आंदोलने केली. मात्र, सरकार आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने या महामार्गाचे काम रखडले आहे. दरवर्षी पावसाळ्यात या महामार्गाची दुरवस्था होत असून, खड्डेमय रस्त्यामुळे अपघात होतात. तसेच वाहतूक कोंडीचा प्रश्न जटील बनतो. गणेशोत्सव काळात गणेशभक्तांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागते.
मुंबई – गोवा महामार्गाचे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार शासनाने केला होता.  मात्र, येत्या होळीपूर्वी किंवा पावसाळ्यापूर्वी या महामार्गाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यासाठी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकणवासियांनी एकत्र येऊन मुंबई – गोवा महामार्ग
ध्येयपूर्ती समितीची स्थापना केली आहे.
या समितीने मुंबई, ठाणे, पालघरसह कोकण विभागात स्वाक्षरी मोहीम घेण्यास सुरूवात केली आहे.  मुंबईतील दादर, भांडुप, परेल, सांताक्रुझ येथे स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. बोरीवली, नालासोपारा, विरार, चारकोप येथेही स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.