कांदळवन संरक्षणाबरोबरच उपजीविकेसाठी जिल्ह्याला २१ लाखांचा निधी 

रत्नागिरी:- कांदळवन संरक्षणाबरोबरच किनारी भागातील ग्रामस्थांना उपजीविकांचे साधन निर्माण करण्यासाठी कांदळवन कक्षाकडून पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील १४४ बचतगटांना १ कोटी ७२ लाखाचे अनुदान दिले. त्यात रत्नागिरीतील १८ बचतगटांना २० लाख ९३ हजार ९२९ रुपये दिले आहेत.

कांदळवन कक्षाने २०२२-२३ या आर्थिक वर्षात कांदळवन संरक्षणासाठी कोकणातील पाच जिल्ह्यात १४४ बचतगटांना एप्रिल २०२२ पासून आतापर्यंत एकूण १ कोटी ७२ लाख ६१ हजार ४८४ अनुदान दिले. या प्रकल्पांच्या अंदाजपत्रकाला अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी तांत्रिक व प्रशासकीय मान्यता दिली आहे. ६८ बचतगट नवीन असून ७६ जुन्या बचतगटांना २०२२-२३ साठी हे अनुदान दिले आहे. सर्वाधिक अनुदान हे जिताडा-काळंदर मासे पिंजरापालन १ कोटी ८९ हजार २२६ रुपये दिले असून शिंदाणे पालनासाठी ४७ लाख ५ हजार ६१३ रुपये अनुदान दिले. २० सप्टेंबर २०१७ पासून कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजना राज्य शासनाच्या कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठानमार्फत राबवली आहे. या योजनेत सामूहिक स्वरूपात (स्वयंसहाय्यता गट) आणि खासगी व्यक्ती यांना कांदळवनातील जिताडा व काळंदर मासे पिंजरापालन, खेकडापालन, कालवे आणि शिंदाणे पालन, शोभिवंत मत्स्यपालन, श्री पद्धत भातशेती, कांदळवनांवर आधारित निसर्ग पर्यटन, गॅस वाटप आदी उपजीविकेचे प्रकल्प देण्यात येतात. २०१७-२२ या वर्षात कोकणातील १४१ गावात ही योजना राबवण्यात आली आहे. या वर्षी दिलेल्या अनुदानातून एक हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांना उपजीविकेचे साधन मिळाले आहे. जून-जुलैपर्यंत हे प्रकल्प राबवून त्यानंतर वाढ झालेल्या माशांची किंवा शिंपल्यांची विक्री करण्यात येईल, असे उपसंचालक डॉ. सुशांत सनये यांनी सांगितले.