विनायक वैद्य यांना सायकल गौरव पुरस्कार प्रदान

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलनात रविवारी पहिला सायकल गौरव पुरस्कार खेड येथील विनायक वैद्य यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ उद्योजक रवींद्र सामंत आणि महाराष्ट्र गिर्यारोहक संघटनेचे उपाध्यक्ष धनंजय मदन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी कार्यक्रमात व्यासपीठावर सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संचालक प्रसाद देवस्थळी आणि नंदाई डिजिटल मार्केटिंगचे धीरज पाटकर व सौ. वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते.

टीआरपी येथील अंबर मंगल कार्यालयात आज सायकल संमेलन उत्साहात साजरे झाले. सत्काराला उत्तर देताना विनायक वैद्य म्हणाले की, सायकल गौरव पुरस्कारामुळे खूप आनंद झालाय. महागातल्या महाग गाडी घेतली असती तर जेवढा श्रीमंत वाटलो नसतो तेवढा सायकलच्या छंदातून श्रीमंत झालो आहे. १० वर्षांचा प्रवास आहे. हा छंद आहे. दिसेल त्या माणसांना सायकलवर बसवू शकलो. त्यांची माहिती इतरांना देत गेलो. मी स्पर्धात्मक सायकलिंग करत नाही. माझे कौतुक केले आहे, बोलायला शब्द नाहीत. या वर्षभरात नवा सायकलस्वार घडवू, असे सर्वांनी ठरवूया.

खेड येथील विनायक वैद्य यांना श्री. वैद्य यांना दिलेल्या सन्मानपत्राचे काव्यमय लेखन देवगड येथील सुप्रसिद्ध कवी प्रमोद जोशी यांनी केले. त्यांनी त्याचे स्वतः सुरेलमय वाचन केले. श्री. वैद्य यांनी गेली अनेक वर्षे ट्रेकिंग, सायकलिंग केले आहे. प्रत्येक वयाच्या व्यक्तीशी जुळवून घेणारे, सायकल गुरुजी म्हणून प्रसिद्ध आहेत. भटक्या खेडवाला या नावाने ते लिखाण करतात. सायकलिंगविषयीचे अनुभव मांडतात आणि दिसेल त्याला सायकलवर बसवतात. खेड सायकलिंग क्लब स्थापन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असून पहिले सायकल संमेलन गतवर्षी खेडमध्ये आयोजित करण्यात मोठे योगदान दिले. त्यानंतरच रत्नागिरी सायकलिस्ट क्लब स्थापन झाला व दुसरे संमेलन भरवण्याचा मान यंदा रत्नागिरीला मिळाला. वैद्य यांच्या सायकलिंग क्षेत्रातील योगदानाबद्दल पहिला सायकल गौरव पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.