वेळास पाठोपाठ गावखडी, मालगुंडसह माडबन समुद्रकिनारी कासवांच्या अंड्यांचे संवर्धन 

रत्नागिरी:- गतवर्षीच्या तुलनेत यंदा ऑलिव्ह रिडले कासवांच्या विणीचा हंगाम एक वेळेत सुरु झाला आहे. वेळास (ता. मंडणगड) पाठोपाठ गावखडी, मालगुंड (ता. रत्नागिरी) आणि माडबन (ता. राजापूर) समुद्रकिना-यावर ४ घरटयांमधुन कासवांच्या ५१० अंड्यांचे संवर्धन करण्यात आले आहे. डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यात कासवांनी ही अंडी घातली आहेत, असे रत्नागिरी वन विभागाकडून सांगण्यात आले.

रत्नागिरी वनपरिक्षेत्रांतर्गत रत्नागिरी तालुक्यातील गावखडी, मालगुंड आणि राजापूर तालुक्यातील वेत्ये व माडबन या समुद्र किनारी ऑलिव्ह रिडले कासवांच्या अंड्यांचे संवर्धन वनविभागामार्फत सुरु आहे. गावखडी येथे १२ डिसेंबर २०२२ महिन्यात कासवाने पहिले घरटे तयार केले. त्यात १२७ अंडी आढळली होती. तर २ जानेवारी २०२३ ला सापडलेल्या एका घरटयात १५१ अंडी होती. दोन घरटयांमध्ये २७८ कासवाची अंडी सापडली आहेत. माडबन येथे १२ डिसेंबरला सापडलेल्या एका घरटयात कासवाची १२४ अंडी होती. मालगुंड येथे २ जानेवारीला आढळलेल्या एका घरटयात कासवांची १०८ अंडी होती. रत्नागिरी व राजापूर तालुक्यातील समुद्रकिना-यालगत ४ घरटयांमधुन कासवांची ५१० अंड्यांचे संवर्धन करण्यात आले आहे. ऑलिव्ह रिडले कासवांची अंडी वनविभागामार्फत संरक्षित केलेली असून ५५ ते ६० दिवसानंतर संरक्षित अंडयामधुन पिल्ले बाहेर येणार आहेत.

दरम्यान, ऑलिव्ह रिडले कासवांचे संवर्धन करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे बारा किनार्‍यांवर प्रकल्प राबविले जात आहेत. यासाठी विभागीय वन अधिकारी दिपक खाडे आणि सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार, वनपाल एन. एस. गावडे, संदानद घाटगे, प्रभू साबणे, शर्वरी कदम, सुरज तेली यांच्यासह कासवमित्र प्रदीप डिंगणकर आणि ऋषिराज जोशी हे कार्यरत आहेत.