रत्नागिरीत पोलीस भरतीला प्रारंभ पहिल्याच दिवशी साडेतीनशे उमेदवार हजर

रत्नागिरी:- जिल्ह्यात होणाऱ्या १३१ जागांसाठीच्या पोलिस भरतीकरिता सोमवार २ जानेवारी पासून प्रारंभ झाला. भरतीच्या पहिल्याच दिवशी साडेतीनशे उमेदवार हजर होते. पुढील दहा दिवस रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. 

राज्यात गृहविभागाने तब्बल १८ हजार पोलिस कर्मचाऱ्यांची पदे भरण्याची घोषणा केली आहे. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यात १३१ पदांसाठी भरतीप्रक्रिया राबवण्यात येत आहे. यात खुल्या वर्गासाठी १८ ते २८ वर्षे, मागासवर्गीय १८ ते ३३ वर्षे वयाची अट आहे. कोकणात ठाणे ग्रामीण ६८, रायगड २७२, पालघर २११, सिंधुदुर्ग ९९, रत्नागिरी १३१ जागांचा समावेश आहे.

प्रत्यक्ष भरतीला सोमवार २ जानेवारी पासून प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी साडेतीनशे उमेदवार हजर होते. भरती प्रक्रिया छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे राबवण्यात आली. पहिल्याच दिवशी अनेक उमेदवारांनी भरती प्रक्रियेकडे पाठ फिरवली. हजर उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली. या भरती प्रक्रियेकडे स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष ठेवून होते.