जिल्ह्यात १६८ संशयित मौखिक कर्करुग्ण

तंबाखूजन्य पदार्थ ; ३,७४८ तपासणीपैकी ९ जणांना बाधा

रत्नागिरी:- तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ आरोग्यासाठी किती घातक आहेत याची पुष्टी देणारी धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातील राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्षाने वर्षभरात ३ हजार ७४८ जणांचे समुपदेशन केले. या वेळी करण्यात आलेल्या तपासणीत ९ जणांना मौखिक कर्करोग झाल्याचे उघड झाले असून, १६८ जण संशयित मौखिक कर्करोग रुग्ण आहेत. यावरून व्यसनमुक्तीच्यादृष्टीने आणखी प्रभावी कार्यक्रम आणि कठोर कायदे करण्याची गरज भासू लागली आहे.

१ जानेवारी २०२३ हा धुम्रपान विरोधी दिनी आहे. या निमित्ताने जिल्हा शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेल्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्षाकडून याबाबतचा आढावा घेण्यात आला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्या नियंत्रणाखाली कक्षाचे काम सुरू आहे. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते. रॅली काढणे, ठिकठिकाणी बॅनर लावणे, पथनाट्य आयोजित करणे आदी कार्यक्रमांतून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन आरोग्यासाठी किती धोकादायक आहे, हे पटवून देऊन लोकांना या व्यसनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न शासकीय यंत्रणेकडून केला जातो तसेच जिल्हा रुग्णालयातील या कक्षाकडून व्यसनाधीन झालेल्या अनेकांचे समुपदेशन केले जाते. समुपदेशनादरम्यान त्यांची तपासणीही केली जाते.

गेल्या वर्षभरात या कक्षाकडून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खणाऱ्या ३ हजार ७४८ जणांची तपासणी करण्यात आली. या वेळी १६८ संशयित मौखिक कर्करोग सापडले तर मौखिक कर्करोगग्रस्त ९ रुग्ण सापडले आहेत.  शाळांमध्ये घेण्यात आलेल्या या कार्यक्रमातून व्यसनमुक्तीचे जनजागृती प्रभावीपणे केल्याने २२ मार्च ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत जिल्ह्यातील ७९ शाळा तंबाखूमुक्त झाल्या आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामीण रुग्णालयातही समुपदेशन केंद्र सुरू आहेत.