रत्नागिरी जिल्ह्यातील ओसाड खेड्यांमध्ये दोन खेड्यांची वाढ

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील ओसाड खेड्यांमध्ये दोन खेड्यानी वाढ झाली आहे. त्याचबरोबर सहा खेडी कमी झाली असून तीन ग्रामपंचायतीसुद्धा कमी झाल्या आहेत. जनगणना शहरांमध्येही वाढ झाली
आहे. दापोलीतील शिर्केनगर, चिपळुणातील गोवळकोट, संगमेश्वरात किंजळे, लांजात कातळगाव, राजापुरात खाजणतड – नानर आणि मजरेजुवे ही ओसाड खेडी आहेत.

पूर्वी ज्या खेड्यांमध्ये वस्ती होती त्या गावांमधून शासनाला दस्तरुपाने महसूल मिळत होता. परंतु धरण, व्याघ्र अशा प्रकल्पांमुळे ज्या खेड्यांमधील वस्तीचे दुसरीकडे पुनर्वसन होते तेव्हा अशी खेडी ओसाड खेडी म्हणून ओळखली जातात. पूर्वी या गावांना किंवा खेड्यांना महसुली गावे म्हणून ओळखले जात होते. या गावांमधून शासनाला दस्त म्हणून मिळणारा महसूल बंद होतो. त्यामुळे अशा गावांची नोंद ओसाड खेडी म्हणून महसूल दप्तरी होत असते.

सन 2009-10 मध्ये चिपळूण, लांजा तालुक्यातील प्रत्येकी एक आणि राजापूरातील दोन अशी एकूण चार खेडी होती. रत्नागिरी जिल्ह्यात दहा वर्षांपूर्वी 1 हजार 543 खेडी होती. ग्रुप ग्रामपंचायती, नगर पंचायती झाल्यानंतर काही गावांची घट झाली. त्यामुळे आता जिल्ह्यात 1 हजार 537 खेडी राहिली आहेत. सहा खेडी जी कमी झाली आहेत ती दापोलीतील तीन आणि रत्नागिरीतील तीन खेडी आहेत. दापोलीत 176 खेडी होती ती आता 173 आणि रत्नागिरीतील 199 खेडी होती ती 196 खेडी झाली आहेत.

सहा वर्षांपूर्वी रत्नागिरी, खेड, चिपळूण, राजापूर या चार नगर परिषदा आणि दापोली नगर पंचायत होती. आता दापोलीसह मंडणगड, गुहागर, देवरूख, लांजा नगरपंचायती झाल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात दहा वर्षांपूर्वी 848 ग्रामपंचायती होत्या त्या आता 845 इतक्या झाल्या आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात जालगाव, खेर्डी, गुहागर, नाचणे, लांजा ही दहा वर्षांपूर्वी जनगणना शहरे होती. यातील लांजा, देवरूख, गुहागर नगरपंचायती झाल्या आहेत. सन 2021 – 22 नुसार गिम्हवणे, जालगाव, दाभोळ, खेर्डी, मौजे अंजनवेल, झाडगाव, नाचणे, कर्ला, कुवारबाव ही जनगणना शहरे आहेत. या ठिकाणी भविष्यात नगरपंचायती स्थापन होण्याची शक्यता आहे.