शाळा निवडीची शिक्षकांना २० डिसेंबरपासून मुभा 

रत्नागिरी:-जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे अपिल करण्याच्या मुदतीमध्ये एकमेव अर्ज प्राप्त झाला होता; मात्र तो सुनावणीत सीईओंनी फेटाळला आहे. पुढील टप्प्यात संवर्ग १ मधील पात्र ठरलेल्या यादीतील शिक्षकांना शाळांचे विकल्प भरण्यासाठी २० डिसेंबरपासून आरंभ होणार आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेसंदर्भात शिक्षणाधिकार्‍यांकडे अपीलावर सुनावणी झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे अपील करण्यासाठी १४ डिसेंबरपर्यंत मुदत होती. यामध्ये एकमेव अर्ज आला होता. त्यावर आज सुनावणी घेण्यात आली. संबंधित शिक्षकांने संवर्ग १ मधून अर्ज केला होता. अर्जदाराचे बदलीपात्र यादीमध्येही नाव होते. संबंधित शिक्षकाला बदलीतून सूट हवी असताना ऑनलाइन अर्जात चुकीचा पर्याय निवडला गेला. ही तांत्रिक चूक सुधारून मिळावी, अशी मागणी सीईओंकडे केली होती; परंतु तशी दुरुस्ती करण्याचे अधिकार किंवा पर्याय ऑनलाइन प्रकियेत दिलेले नाहीत. परिणामी, सीईओंनी त्यांचा प्रस्ताव फेटाळल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. एकमेव अर्ज असल्याने जास्त काळ सुनावणी झालेली नाही. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे बदलीसाठीचा पुढील प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. शिक्षण विभागाकडून बदली पात्र, बदली अधिकार पात्र, विशेष संवर्ग १, २ यांची अंतिम यादी १९ डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. २० डिसेंबरपासून संवर्ग १ मधील समाविष्ट शिक्षकांना बदलीसाठी शाळांची नाव भरण्यास सुरवात होणार आहे. विकल्पामध्ये ३० शाळांची नावे भरावयाची आहेत. बदलीपात्र आणि बदली अधिकार पात्र ठरलेल्या यादीत पावणेतीन हजार शिक्षकांचा समावेश आहे.