कोकणासाठी स्वतंत्र मत्स्यविज्ञान विद्यापीठ निर्मिती व्हावी

मनसेचे १९ डिसेंबर ला एकदिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन

रत्नागिरी:- कोकणासाठी स्वतंत्र मत्स्यविज्ञान विद्यापीठ व्हावे ही मागणी २००७ पासून जोर धरून लागली होती. डॉ. भालचंद्र मुणगेकरांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. पण प्रत्येक सरकार त्या अहवालावर अभ्यास करत बसले. स्वतंत्र मत्स्यविज्ञान विद्यापीठ निर्मितीची कोकणवासीयांना प्रतिक्षाच आहे. यासाठी मनसेने १९ डिसेंबरला सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी दिली.

रत्नागिरीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष रूपेश जाधव, कामगार सेना नेते सुनील साळवी, अरविंद मालाडकर, बिपीन शिंदे, राजू पाचकुडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्राला लाभलेल्या विस्तीर्ण किनारपट्टीवरील जनतेला मासेमारी हे एकमेव रोजगाराचे साधन आहे. मच्छीमारांच्या मुलांना या व्यवसायाशी निगडित शिक्षण मिळाले तर त्यांच्या उत्पन्नात निश्‍चितच वाढ होऊ शकते. यासाठीच रत्नागिरी येथे मत्स्य महाविद्यालय सुरु करण्यात आले. त्याचीच पुढील पायरी म्हणजेच कोकणासाठी स्वतंत्र मत्स्यविज्ञान विद्यापीठ ही आहे. डॉ. मुणगेकर समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे तामिळनाडु सरकारने मत्स्य विज्ञान विद्यापीठ वसवले. पण कोकणासाठी स्वतंत्र मत्स्यविज्ञान विद्यापीठाचा प्रश्‍न खितपत राहीला. मधल्या काळात रत्नागिरीतील हे महाविद्यालय नागपूर मत्स्य विद्यापीठाला जोडण्यासाठी हालचाली सुरु झाल्या. याविरोधात मनसेने आवाज उठवला होता. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी मनसेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.