मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यासाठी येणारे रिफायनरी विरोधक नजरकैदेत 

रत्नागिरी:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवण्याच्या तयारीत आलेल्या राजापूर येथील रिफायनरी विरोधकांना रत्नागिरी शहर पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. भाट्ये चेकपोस्ट येथे पोलिसांनी गनिमी कावा साधत या विरोधकांना ताब्यात घेतले. तब्बल १५ ते २० आंदोलकांना ताब्यात घेत या आंदोलकांना पूर्णगड पोलीस स्टेशनमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले होते. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौर्‍यात सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी कोणतीही कसूर ठेवली नाही. त्यातच रिफायनरी विरोधक काहीतरी हालचाल करणार याची चाहूल पोलिसांना लागली होती. त्यानुसार पोलिसांनी मुंबई गोवा महामार्गासह सागरी महामार्गाकडेदेखील लक्ष ठेवले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवण्याचा डाव रिफायनरीविरोधकांनी आखला होता. यासाठी राजापूर येथून मोठ्या प्रमाणात रिफायनरी विरोधक रत्नागिरीकडे निघाल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी भाट्ये चेकपोस्ट येथे नाकाबंदी सुरू केली.

खाजगी वाहनातून हे रिफायनरीविरोधक रत्नागिरीत येत होते. त्यांच्या गाड्या भाट्ये चेकपोस्ट येथे आल्या असता पोलीस तपासणीवेळी या गाड्यांमध्ये रिफायनरी विरोधक असल्याची माहिती पुढे आली. ३ वाहनांमधून रिफायनरी विरोधक रत्नगिरीत येत होते. पोलिसांनी रिफायनरी विरोधकांना भाट्ये चेकपोस्ट येथेच ताब्यात घेतले व सर्वांना पूर्णगड पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले.

पूर्णगड पोलीस स्थानकात ताब्यात घेतलेल्या रिफायनरी विरोधकांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. मुख्यमंत्री रत्नागिरी दौऱ्यावर असेपर्यंत हे विरोधक नजरकैदेत होते. तर दुसरीकडे या मार्गावरुन येणार्‍या सर्वच वाहनांची कसून तपासणी पोलिसांनी सुरू ठेवली होती.