चक्रिवादळाच्या प्रभावाने, बदललेल्या वातावरणाने पहिल्या टप्प्यात मोहर गळण्याची भीती

कृषी विभाग सतर्क; क्रॉपसॅप अंतर्गत मोहर संरक्षण कार्यक्रम

रत्नागिरी:- चक्रिवादळाच्या प्रभावाने आणि बदललेल्या वातावरणाने  ऐन आंबा हंगामाच्या पहिल्या टप्प्यात मोहर गळण्याची आणि रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती अनेक शेतकरी आणि बागायतदारांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी जिल्ह्यात क्रॉपसॅप अंतर्गत मोहर संरक्षण कार्यक्रम कृषी विभागातर्फे सक्रिय करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक सुनंदा कुर्‍हाडे यांनी दिली.

दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने आबा मोहोराचे पर्यायाने फळांचे मोठे नुकसान होताना दिसून येते. जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड पडला तर अशा वेळी बागेमध्ये आंब्याला मोहोर यायला सुरुवात होते. विशेषतः समुद्रानजीकच्या आंबा बागेमध्ये अवेळी मोहोर येण्याची उदाहरणे आहेत. अशा आंब्याच्या झाडाला उशिरा मोहोर येण्याची दाट शक्यता असते. प्रमुख व दुय्यम पोषण द्रव्यांची कमतरता, संजिवकांचा आभाव, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आणि कीड-रोगांचा प्रादुर्भाव यांसारख्या कारणांमुळे मोहोर गळ आणि फळगळ होते.

बदलत्या वातावरणाने आंबा कलमांवर बुरशीजन्य रोगासह  वादळी वार्‍याच्या शक्यतेने मोहर गळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात प्रातिनिधीक स्वरुपात पाहणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यासाठी कृषी विभागाने क्रॉपसॅप अंतर्गत मोहर संरक्षण कार्यक्रमही सक्रिय केलाआहे. त्याची अंमलबजावणी प्रत्येक तालुक्यात करण्यात येणार आहे.