चालू हंगामासाठी 40 बागायतदारांची मँगोनेट प्रणालीला पसंती

रत्नागिरी:- निर्यातीसाठी ‘मँगोनेट’ वरील नोंदणी अत्यावश्यक आहे. 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 31 मार्च 2023 पर्यंत नोंदणी करावयची असून आतापर्यंत 40 बागायतदारानी प्रतिसाद दिला आहे.

युरोपियन युनियन आणि इतर देशांना आंबा निर्यातीकरिता कृषी आणि प्रक्रिया खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणच्या (अपेडा) मँगोनेट प्रणालीद्वारे निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी केली जाते. रत्नागिरी जिल्ह्यात 2021-22 मध्ये निर्यातक्षम आंबा बागांची मोठ्याप्रमाणात नोंदणी झाली आहे. निर्यात आंबा बागांची नोंदणी 5 वर्षासाठी वैध आहे. त्यामुळे गतवर्षी नोंदणी केलेल्या आंबा बागांची नव्याने नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. 2022-23 या वर्षासाठी नव्याने नोंदणी करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज, 7/12, 8 अ, बागेचा नकाशा इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. मँगोनेटद्वारे नोंदणी करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2023 पर्यंत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व आंबा बागायतदारांनी निर्यातक्षम बागांची नोंदणी करण्याकरिता आपल्या कार्यक्षेत्रातील तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून विहित मुदतीत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती सुनंदा कुर्‍हाडे यांनी केले आहे.

निर्यात करणाऱ्या आंबा बागायतदारांची जिल्ह्यातील संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरवर्षी हजार बागायतदार नोंदणी करतात. गतवर्षी 1643 बागायतदारांनी वर्षभरात नोंदणी केली होती. यंदा सुरुवात झाली असून 40 नवीन बागायतदार निर्यातीसाठी तयार झाले आहेत. ऑनलाईन नोंदणी केलेल्या बागायतदारांना त्यांचे सर्टिफिकेट दिलेले आहे. ते सादर केल्याशिवाय आंबा निर्यात केला जात नाही. मँगोनेट सर्टिफिकेट हापूसच्या दर्जाची ओळख आहे. त्याचा गैरवापर होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.