मतलई वारे परतले; जिल्ह्यात पुन्हा थंडीचा जोर वाढला

रत्नागिरी:- मागील आठवड्यात तापमानात चढ-उतार होता. त्यामुळे थंडीचे प्रमाण कमी होते; मात्र गेल्या दोन दिवसात मतलई वारे वाहू लागल्यानंतर पारा घसरु लागला असून दापोलीत १२.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. सध्याचे वातावरण हापूसला पोषक असले तरीही ऑक्टोबर हिट म्हणावी तशी जाणवलेली नसल्याने आंबा हंगाम एक महिना पुढे जाण्याची शक्यता आंबा बागायतदारांकडून वर्तविली जात आहे.

उत्तरेकडून येणार्‍या वार्‍याचा प्रवास थांबून थांबून सुरु होता. परिणामी कोकणात मागील आठ दिवसांमध्ये थंडीची तिव्रता कमी-अधिक प्रमाणात होती. पहाटेला थंडी जाणवत असली तरीही त्यात तेवढा जोर नव्हता. मागील आठवड्यात दापोली तालुक्यात सर्वात कमी १३.२ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली. त्यानंतर पुन्हा पारा वर चढू लागला. मागील दोन दिवसांपासून वातावरणात बदल होऊ लागले असून सलग दोन दिवस वारे वाहत आहेत. त्यामुळे थंडीचा जोर वाढला असून हापूसला पोषक वातावरण आहे. यंदा थंडी कमी-अधिक प्रमाणात असल्यामुळे आंबा कलमांना आलेली पालवी जून होऊन त्याला मोहोर येण्याची प्रक्रिया यंदा संथ गतिने सुरु होती. 

यंदा ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत पावसाचे वातावरण होते. त्यामुळे ऑक्टोबर हिट जाणवली नाही. झाडांच्या मुळांमधील पाणी सुखलेले नाही. यावर्षी ७० टक्केहून अधिक कलमांना पालवी फुटलेली असल्याने मोहोर फुटण्यासाठी कालावधी लागणार आहे. कल्टार आणि औषध फवारणी केलेल्या कलमांना फुट येण्यास सुरवात झाली आहे. ते प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे हंगाम एक महिना लांबेल अशी स्थिती आहे. हवामान विभागाकडून पुढील काही दिवसात पावसाची शक्यता वर्तविली आहे. पाऊस पडला नाही, तर हापूसचा प्रवास सुकर होणार आहे. अन्यथा पुन्हा किडरोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि औषध फवारणीचा खर्च वाढू शकतो असे बागायतदारांचे मत आहे.

दरम्यान, थंडी सुरु झाल्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी रब्बी हंगामातील शेतीला आरंभ झाला आहे. पावटे, वाल, चवळी, कुळीथ यासह विविध प्रकारची भाजी लागवड केली जात आहे. वेळेत पेरणी केलेल्या गावांमध्ये रोपही रुजून आलेली आहेत.