अँटी करप्शन ब्यूरोकडून आ. वैभव नाईकांची साडेचार तास चौकशी

9 डिसेंबर रोजी कागदपत्रे सादर करण्याचे आदेश, चौकशीला पत्नी व भावाची उपस्थिती

रत्नागिरी:-कणकवली-कुडाळचे आमदार वैभव नाईक यांची पत्नी व भावासह रत्नागिरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सुमारे साडेचार तास चौकशी करण्यात आली. शिंदे गटात सहभागी होत नसल्यानेच दबाव टाकला जात आहे. यामागे भाजपचे षढयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी चौकशीनंतर पत्रकारांशी बोलताना केला.

चौकशीला कुटुंबियांसह सामोरे गेल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की 1996पासून आपण व्यवसाय करीत असून, त्यावेळेपासून आपल्याकडील कागदपत्रे, करभरल्याची माहिती आपण लाचलुचपत विभागाला दिली आहे. या विभागाने पत्नी व भावाचीही चौकशी केली. या सर्वांमागे राज्य सरकार विशेषत: भाजप असल्याचे त्यांनी सांगितले.

शिंदे गटाने आपल्याकडे खेचण्यासाठी मंत्र्यांमार्फत बरेच प्रयत्न केले. परंतु आपण त्यांना दाद दिली नाही. त्यामुळेच दबाव टाकण्यासाठी राजकारण केले जात आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते व आ. राजन साळवी यांना पाठवण्यात आलेली नोटीस ही दबाव टाकण्याचाच भाग असल्याचा आरोपही आ. वैभव नाईक यांनी केला.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कार्यालये ही प्रत्येक जिल्ह्यात आहेत. परंतु स्थानिक अधिकार्‍यांवर सरकारचा विश्वास नसल्याने मला रत्नागिरीत तर आ. साळवी यांना अलिबागला चौकशीसाठी बोलावले गेले. हा मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न असून आपण यात दबणार नसल्याचेही आ. नाईक यांनी स्पष्ट केले.
रत्नागिरीत आल्यानंतर आ. साळवी यांनी आ. वैभव नाईक यांची भेट घेतली. त्यानंतर आ. साळवी हे आ. नाईक यांच्यासोबत लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात दाखल झाले होते. 12.30 वा. चौकशी सुरु झाल्यानंतर आ. साळवी आपल्या घरी परतले.  त्यानंतर सायंकाळी पाचवाजेपर्यंत त्यांची चौकशी सुरु होती. आ. वैभव नाईक, त्यांच्या पत्नी व भावाचे स्टेटमेंट अधिकार्‍यांनी नोंदवून घेतले. 9 डिसेंबर रोजी कागदपत्र सादर करण्याच्या सूचना आ. नाईक यांना देण्यात आल्या आहेत.