विकास योजना नकाशानुसार सीमांकन निश्चित करून मिर्‍या बंधाऱ्याचे काम करा

रनप प्रशासनाची पत्तन विभागाकडे मागणी

रत्नागिरी:- शहरातील मुरुगवाडा पांढरा समुद्र ते मिर्‍या येथील धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्यापूर्वी नगरपरिषदेच्या अखत्यारितील विकास योजनेतील मंजूर रस्त्याची हद्द आहे. त्यामुळे धूपप्रतिबंधक बंधार्‍याचे काम करताना शासनाच्या विकास योजना नकाशानुसार सीमांकन करून हा धूपप्रतिबंधक करून घ्यावा. त्यानुसार होणार्‍या कार्यवाहीची माहिती रत्नागिरी नगर परिषदेला अवगत करावी, असे रत्नागिरी नगरपरिषदेने पत्तन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना कळवले आहे.

मिर्‍या येथे धूपप्रतिबंधक बंधार्‍याचे काम सुरु झाले. या बंधार्‍याच्या ठिकाणाहून रत्नागिरी नगरपरिषदेचा 12.19 मिटरचा रस्ता गेला आहे. हा रस्ता शासनाने मंजूर केलेल्या विकास योजनेतही आहे. परंतू जेव्हा या बंधार्‍याचे काम सुरु झाले तेव्हा याबाबत कोणतीही दक्षता घेतली गेली नव्हती. पत्तन विभागाकडून बंधार्‍याच्या कामाचे सीमांकन (लाईनआऊट) करून देण्यात आले नव्हते. त्यामुळे ठेकेदार कंपनीने आपल्या अंदाजानुसार किंवा तेथील बंधार्‍याच्या आवश्यकतेनुसार काम सुरु केले. या पद्धतीचे काम रस्त्याला अडचणीचे ठरणार असल्याने 15 माड येथील ग्रामस्थांनी आक्षेप घेऊन काम बंद करण्यास भाग पाडले होते.

रत्नागिरी नगर परिषदेच्या मालकीचा बंधार्‍याजवळून रस्ता गेला असल्याने आणि ग्रामस्थांच्या तक्रारी आल्यानंतर रत्नागिरी नगर परिषदेने दखल घेतली. त्यानुसार पत्तन विभागाचे कार्यकारी अभियंता भाऊसाहेब हजारे यांना लेखी पत्र देऊन योग्य ती खबरदारी घेण्यास कळविले आहे. मुरुगवाडा पांढरा समुद्र ते मिर्‍या धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्यापूर्वी येथून जाणारी नगरपरिषदेची हद्द आणि रस्त्याची हद्द लक्षात घेण्यात यावी. विकास योजनेच्या नकाशानुसार प्रत्यक्षात सीमांकन करून धूपप्रतिबंधक बंधार्‍याचे काम होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नकाशानुसार सीमांकन करून बंधारा होत असल्याची खात्री करून नगरपरिषदेला कळवावे, असे सांगण्यात आले आहे. या पत्राची प्रत जिल्हाधिकार्‍यांसह मेरीटाईम बोर्डलाही देण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्हाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी या बंधार्‍याच्या कामाला 160 कोटी रुपये मंजूर करून घेतले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या बंधार्‍याची मागणी होत होती. परंतू काम सुरु करण्याबाबत सर्व प्रशासकीय कार्यवाही होवूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नव्हती. आता मात्र बंधार्‍याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.