हंगामाच्या सुरुवातीलाच बागायतदारांच्या खांद्यावर खर्चाचा बोजा

रत्नागिरी:- बदलत्या वातावरणामुळे आंबा बागायतदार त्रस्त झाले आहेत. गेले पाच दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे तुडतुडा, मिजमाशी, शेंडे पोखरणारी किडीचा प्रादुर्भावर दिसू लागला आहे. मोहोर आणि पालवी सुरक्षित ठेवण्यासाठी बागायतदारांनी औषध फवारणी सुरु केली आहे. हंगामाचे चित्र स्पष्ट होण्यापुर्वीच खर्चाला सुरवात झाली आहे. सध्याची परिस्थिती पाहता मार्च महिन्यात उत्पादन कमी आल्यामुळे हापूसचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे.

कोकणातील अर्थव्यवस्था अवलंबून असलेल्या हापूसला फयान चक्रीवादळानंतर ग्रहण लागलेले आहे. दरवर्षी वातावरणातील बदलांना सामोरे जावे लागत आहे. संवेदनशील असलेल्या हापूसवर वातावरणाचे परिणाम होत आहेत. यंदाही सुरवात झाली असून थंडीपेक्षाही अवकाळीचे आव्हान आंबा बागायतदारांपुढे आहे. २२ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. शुक्रवारी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतरही पुन्हा ढगाळ वातावरण आहे. ही परिस्थिती लवकर निवळून थंडीचा कडाका वाढणे आंबा कलमांसाठी आवश्यक आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा ९० टक्के झाडांना अजुनही पालवी आहे. दहा टक्केच कलमे मोहोरलेली असून त्यामधून उत्पादन मिळवण्यासाठी बागायतदारांना आटापिटा करावा लागत आहे. पालवी जुन होण्यासाठी पोषक वातावरण पुढे तयार होईल अशी आशा शेतकर्‍याला आहे. कोकण कृषी विद्यापिठाकडून प्राप्त अहवालामध्ये पुढील आठवड्यात हवामान कोरडे राहील असे संकेत दिले आहेत; मात्र ३० नोव्हेंबरला पुन्हा ढगाळ हवामानाचा अंदाज वर्तविला आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर हापूसच्या उत्पादनात यंदा घट होईल अशी भिती व्यक्त केली जात आहे.
देवगड (सिंधुदुर्ग) येथून एक आंबा पेटी मुंबईत रवाना झाली असून दोन डझनला नऊ हजार रुपये मिळाले आहे. आफ्रीकेचा मलावी आंबाही मुंबईत दाखल झाला आहे. तिन किलोला ३ ते ५ हजार रुपये दर मिळाल्याचे समजते. हापूस हंगामाचे अजुनही अनिश्‍चित चित्र आहे. दरवर्षी जानेवारीच्या अखेरीस मुहूर्ताची पेटी जिल्ह्यातून रवाना होते. फेब्रुवारीत कमी उत्पादन राहते, पण मार्च महिन्यात पेट्यांची संख्या वाढते. गतवर्षी थोडी आवक कमी होती. यंदाही तेच चित्र राहील असा अंदाज बागातयदारांसह व्यापार्‍यांकडून वर्तविला जात आहे. आवक कमी राहीली तर हापूसचे दर चढे राहतील. गतवर्षी पाच डझनच्या पेटीला सहा हजारापासून आठ हजार रुपयांपर्यंत दर मिळाला होता. यावर्षी तशीची काहीशी परिस्थिती राहू शकते. परंतु उत्पादन कमी असल्याने बागायतदारांचे आर्थिक गणितावर परिणाम होईल. तसेच आवक वाढण्यासाठी एप्रिल उजाडेल असे बागायतदारांकडून सांगितले जात आहे.